Yellow Alert : अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

0
Yellow Alert : अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Yellow Alert : अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Yellow Alert : नगर : भारतीय हवामान विभागाने ८ जुलै रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील नद्यांमधील वाढता विसर्ग आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या तसेच धरण परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.

हेही वाचा : कर्जमाफीवरील अधिकृत बैठक ऐनवेळी रद्द; किसान सभेचा सरकारवर गंभीर आरोप

पाणलोट क्षेत्रात पाऊस

सध्या जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये विसर्ग सुरू असून अहिल्यानगर, पुणे व नाशिक जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास भीमा व गोदावरी नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी तसेच प्रवरा व मुळा नदीकाठावरील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नक्की पहा : भंडारदरा परिसरात अपघात; सहा पर्यटक जखमी

अशी घ्या काळजी (Yellow Alert)

धरण व नदी परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी पाण्यात उतरू नये तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. नदी, ओढे व नाल्यांतील पाणीपातळी वाढत असल्यास प्रवाहापासून दूर राहून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. पुलांवर किंवा बंधाऱ्यांवरून पाणी वाहत असल्यास ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन किंवा दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे आणि घाट रस्त्याने प्रवास टाळावा. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची व जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या पोलीस ठाणे, तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाशी ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४०, ११२ किंवा १०७७ या टोल-फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा.