
Minister of State for Tourism Indranil Naik : अहिल्यानगर : वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेची ओळख असून, शुद्ध अंतःकरणाने विठ्ठलभक्तीचा मार्ग स्वीकारणाऱ्या वारकऱ्यांच्या वारीचा अनुभव अवर्णनीय असतो. ही अखंड वारकरी परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत टिकून राहिली पाहिजे. संत निळोबाराय संस्थानचा (Sant Nilobaray Sansthan) सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यात यावा. त्यासाठी पर्यटन विभागामार्फत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, संस्थानला ‘अ’ दर्जा प्राप्त करून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक (Minister of State for Tourism Indranil Naik) यांनी केले.

पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथे संत निळोबाराय महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आयोजित अभंगगाथा प्रकाशन, पादुकापूजन, पालखीपूजन आणि रथपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
अनेक मान्यवरांची उपस्थिती
यावेळी आमदार काशिनाथ दाते, संत निळोबाराय संस्थानचे अध्यक्ष अशोक सावंत, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, तहसीलदार श्रीमती गायत्री सैंदाणे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, श्रीमती संध्या सोनवणे, ह.भ.प. डॉ. विकासानंद मिसाळ महाराज आदी उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
राज्यमंत्री नाईक म्हणाले, (Minister of State for Tourism Indranil Naik)
वारकरी संप्रदायातील शिस्तबद्ध जीवनशैली, संयम आणि सेवाभाव प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. समाजातही ही शिस्त आणि संस्कार जोपासण्याची आवश्यकता आहे. वारकरी संप्रदायातील ही शिस्त प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारावी, असे त्यांनी आवाहन केले.

ते पुढे म्हणाले की, श्रीक्षेत्र पिंपळनेर आणि संत निळोबाराय संस्थान हे धार्मिक तसेच पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता आहे. शिरूर-वाडेगव्हाण फाटा ते साकूर या मार्गावरील राळेगणसिद्धीला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून तरतूद करण्यात येईल. तसेच, पर्यटन विभागाच्या माध्यमातून या परिसराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. संस्थानचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने विकासकामे राबविण्यात येतील.
आमदार काशिनाथ दाते म्हणाले, समाधानकारक पर्जन्यमानामुळे वारकरी आणि शेतकरी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्य शासनाने वारकऱ्यांच्या मुक्काम, आरोग्यसेवा, औषधोपचार, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधांची चांगली व्यवस्था केली आहे. संत निळोबाराय महाराजांच्या पालखीसोबत राज्यातील विविध भागांतून ७१ दिंड्या सहभागी होत असून, या पालखी सोहळ्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. पारनेर ते पंढरपूर मार्गावरील रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळावी आणि या पालखी सोहळ्याचे स्वरूप भविष्यात अधिक भव्य व व्यापक व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी राज्यमंत्री नाईक यांच्या हस्ते संत निळोबाराय महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखीचे पूजन करून त्यांनी दर्शन घेतले. पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या पालखी रथाचेही त्यांनी पूजन केले. संत निळोबाराय महाराजांच्या अभंगांचा वारसा जतन करणाऱ्या ‘अभंगगाथा’ ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पालखी प्रस्थान सोहळ्यास उपस्थित राहून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
संस्थानचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी प्रास्ताविकात पालखी सोहळ्याची परंपरा, संस्थानमार्फत राबविण्यात येणारे धार्मिक व सामाजिक उपक्रम तसेच भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती दिली. ह.भ.प. डॉ. विकासानंद मिसाळ महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, संस्थानचे पदाधिकारी, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


