LCB : नगर : अहिल्यानगर शहरातील तपोवन रस्ता, सूर्यनगर परिसरात घरातून अवैधरित्या मावा तयार करून त्याची विक्री करणाऱ्या दोन ठिकाणांवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) रविवारी (ता.१२) पहाटे कारवाई केली. या कारवाईत सुमारे ९९ हजार ७०० रूपयांचा सुगंधित तंबाखू, तयार मावा, बारीक सुपारी, मावा तयार करण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक व लोखंडी मशीन तसेच प्लास्टिकच्या पुड्यांसह विविध साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हे (Crimes) दाखल करण्यात आले आहेत.
घरात प्रतिबंधित असलेला मावा तयार करून विक्री
जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे यांच्यासह अंमलदार सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, सागर ससाणे, मनोज साखरे, सतीश भवर, भगवान धुळे, भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकाला माहिती मिळाली होती की, तपोवन रस्त्यालगतच्या सूर्यनगर येथील एस.टी. कॉलनी परिसरात सचिन दिलीप पवार (वय ४०) आणि राहुल नवनाथ गिते (वय ३०) हे त्यांच्या राहत्या घरात मशीनच्या साहाय्याने विक्रीस प्रतिबंधित असलेला मावा तयार करून विक्री करत आहेत. या माहितीची खातरजमा करून पथकाने दोन्ही ठिकाणी एकाच वेळी छापा टाकला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
एकूण ९९ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त (LCB)
छाप्यादरम्यान दोघेही मावा तयार करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून सुगंधित तंबाखू व सुपारी मिश्रित मावा, तयार मावा, बारीक सुपारी, मावा तयार करण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक व लोखंडी मशीन तसेच प्लास्टिकच्या पुड्या असा एकूण ९९ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन्ही संशयितांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांचा पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.



