
The Issue of Citizens’ Health : पारनेर : पारनेर शहरातील स्वच्छता आणि नियोजनाचा अभाव (Lack of Cleanliness) पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वारंवार सूचना देऊनही पारनेर नगरपंचायत प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्याने, आता पारनेर बसस्थानक (Parner Bus Stand) परिसरातील गटारीचे दूषित सांडपाणी थेट रस्त्यावर वाहू लागले आहे. यामुळे स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, आरोग्याचा गंभीर प्रश्न (The Issue of Citizens Health) निर्माण झाला आहे.
दररोज हजारो नागरिक आणि प्रवाशांची ये-जा
काही दिवसांपूर्वीच शहरातील विविध भागांतील तुंबलेल्या आणि अस्वच्छ गटारींबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र, या वृत्तांकनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली नाही. परिणामी, बसस्थानकासारख्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी गटारी तुंबल्या आणि सांडपाणी रस्त्यावर पसरले. बसस्थानक परिसर हा शहराचा मुख्य भाग असल्याने येथे दररोज हजारो नागरिक आणि प्रवाशांची ये-जा असते. रस्त्यावरून वाहणाऱ्या या दूषित पाण्यामुळे नागरिकांना नाकावर रुमाल धरून चालावे लागत आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
डासांची उत्पत्तीने साथीच्या आजारांचा धोका (The Issue of Citizens’ Health)
या दुर्गंधीमुळे बसस्थानक परिसरात व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच, दूषित पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने या सांडपाण्यातून आरोग्याच्या समस्या अधिक उग्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “नगरपंचायतीला वारंवार सांगूनही यावर ठोस उपाययोजना केली जात नाही, ही संतापजनक बाब आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
बसस्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी अशी अस्वच्छता असणे प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करते. नगरपंचायत प्रशासनाने केवळ कागदी घोडे न नाचवता, तातडीने या परिसरातील गटारींची स्वच्छता करावी आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे. जर प्रशासनाने अजूनही ही बाब गांभीर्याने घेतली नाही, तर नागरिकांना आरोग्य रक्षणासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही जागरूक नागरिकांनी दिला आहे.
आता तरी नगरपंचायत प्रशासन जागृत होऊन तत्काळ कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


