
नगर : जामखेड (Jamkhed News) तालुक्यातील राजेवाडी येथे आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या विवाह सोहळ्याला एका धक्कादायक घटनेने गालबोट लागले. स्वागतावेळी आपले नाव माईकवरून पुकारले नाही, या क्षुल्लक कारणावरून एका तलाठ्याने संतापाच्या भरात माईक हातातून हिसकावून तोच लोखंडी माईक (The Talathi’s Thuggery)एका तरुणाच्या डोक्यात घातल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता.११) ला दुपारी घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी (Youth critically injured) झाला असून जामखेड पोलीस ठाण्यात तलाठी शिवाजी सखाराम हजारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
नेमकं काय घडलं? (Jamkhed News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळा (ता. जामखेड) येथील अशोक रामचंद्र पठाडे हे राजेवाडी येथील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित विवाह सोहळ्यात सूत्रसंचालन करत होते. विवाहासाठी आलेल्या नातेवाईक आणि मान्यवरांचे ते माईकवरून स्वागत करत असतानाच तलाठी शिवाजी हजारे यांनी त्यांच्याकडे येत माझं नाव माईकवर का पुकारलं नाही? असा जाब त्यांना विचारला. या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. आरोपानुसार, संतापलेल्या हजारे यांनी पठाडे यांना शिवीगाळ करत तोंडावर मारहाण केली. त्यानंतर हातातील लोखंडी रॉड असलेला माईक हिसकावून तो त्यांच्या डोक्यात जोरात मारला. या हल्ल्यात पठाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. एवढ्यावरच न थांबता तुला खल्लास करतो अशी जीवे मारण्याची धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.या घटनेनंतर विवाहसोहळ्यात एकच गोंधळ उडाला.
अवश्य वाचा : राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
उपस्थित जीवन मोहन रोडे, तानाजी लक्ष्मण पवार आणि प्रशांत भाऊसाहेब पवार यांनी तत्काळ धाव घेत भांडण सोडवले आणि जखमी पठाडे यांची सुटका केली. त्यानंतर प्रशांत मारुती शिंदे यांनी त्यांना उपचारासाठी जामखेड मधील ग्रामीणरुग्णालयात दाखल केले.या प्रकरणी जखमी अशोक रामचंद्र पठाडे यांच्या फिर्यादीवरून तलाठी शिवाजी हजारे याच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार तुकाराम सोनवणे या घटनेचा सखोल तपास करत आहेत.


