
Ahilyanagar District Cooperative Bank : नगर : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Cooperative Bank) निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. ही निवडणूक (Election) पक्ष विरहित लढवायची, अशा येथील नेत्यांचा शिरस्ता असला तरी आतापर्यंत राज्यस्तरावर दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची भूमिका महत्वाची ठरत असे. आता त्यांची जागा कोण घेणार? असा प्रश्न आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्याकडे ही सूत्रे जाण्याची चिन्हे आहेत. स्थानिक पातळीवर मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना घेरण्याच्या हालचाली भाजपमधील काही आणि विरोधातील नेत्यांनी एकत्र येत सुरु केल्याचे दिसून येते.
या बँकेची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. मतदार यादी तयार करण्यासाठी गाव पातळीवरील विविध कार्यकारी सोसायट्यांचे मतदार प्रतिनिधी ठरविण्यासाठी ठराव करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बँकेत सोसायटी मतदारसंघ हा महत्वाचा असतो. त्या जागेवरील उमेदवाराला मतदान करण्यासाठी सोसायट्या ठराव करून आपला प्रतिनिधी नियुक्त करीत असतात. सोसायट्यांनी ठराव केलेल्या या मतदाराला पुढे खूप महत्व येते. त्यामुळे ठराव करतानाच आपल्या मर्जीतील पदाधिकाऱ्याचा व्हावा, यासाठी नेते प्रयत्न करतात. तेच सध्या जिल्ह्यात सुरू आहे. काही ठिकाणी तर यावरून वादही झाले आहे.
नक्की वाचा : जन्म, मृत्यूच्या दाखल्यांसाठी नागरिकांचे हेलपाटे!; महापालिका प्रशासनाचा सावळा गोंधळ
प्रा. राम शिंदे सक्रीय
आतापर्यंत बँकेच्या राजकारणापासून दूर असलेले विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यावेळी सक्रीय झाले आहेत. त्यांच्या नावाने कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक गावात ठरावही करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे यांची थेट निवडणुकीत उतरण्याची तयारीही दिसून येते. मागील वर्षी बँकेच्या वार्षिक अहवालात शिंदे यांचे छायाचित्र नव्हते. त्यावरून राजकारण तापले होते. तेव्हाच शिंदे यांनी बँकेच्या राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत दिले होते. आता शिंदे यांनी सक्रीय होत विखे यांच्या विरोधात मोट बांधण्यासही सुरवात केल्याचे दिसते. पारनेरमध्ये खासदार नीलेश लंके सक्रीय झाले आहेत. त्यांच्या मर्जीतील सदस्यांचे तालुक्यात ठराव होत आहेत. तर कोपरगावचे आमदार विवेक कोल्हे हेही सक्रीय झाले आहेत. विखेंच्या विरोधातील भाजपमधील आणि अन्य पक्षातील नेत्यांना एकत्र करण्याची चाल यातून दिसून येत आहे. याशिवाय विखे यांचे पारंपरिक विरोधक ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याही हालचाली सुरू आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आता फडणवीसांचा शब्द प्रमाण?(Ahilyanagar District Cooperative Bank)
यापूर्वी जेव्हा जेव्हा बँकेत राजकीय अगर प्रशासकीय पेच निर्माण होत होता, त्यावेळी अजितदादांचा शब्द अंतिम ठरत असे. बराच काळ ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजितदादा यांचे बँकेच्या राजकारणात वर्चस्व होते.
आता ही जागा कोण घेणार, अशी चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांना संधी असल्याचेही बोलले जाऊ लागले आहे. राम शिंदे असो की विखे पाटील या दोघांचेही नेते फडणवीसच आहेत. त्यामुळे यावेळी फडणवीस यांचे नगरच्या बँकेत लक्ष असणार असे मानले जाऊ लागले आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात अंतिम सूत्रे नेहमीप्रमाणे राज्यस्तवरूनच हालणार, हेही दिसून येते.


