
Birth and Death Certificates : नगर : जन्म-मृत्यू दाखल्यासाठी (Birth and Death Certificates) शहरासह जिल्हाभरातून नागरिक महापालिका कार्यालयांच्या (Municipal Corporation Office) प्रभाग कार्यालयांमध्ये येतात. मात्र, वारंवार हेलपाटे मारूनही महापालिका प्रशासनाकडून दाखले मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सावेडीसह इतर प्रभाग कार्यालयांमध्ये नागरिकांना संबंधित दाखल्यांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत रांगेत थांबूनही ‘सर्व्हर डाऊन’ आहे दाखले मिळणार नाही, ‘नंतर या’ असे ऐनवळी सांगितले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
काही दिवसांपासून दाखले वेळेवर मिळेना
महापालिका प्रशासनाने नागरिकांना जन्म, मृत्यूचे दाखले वेळेत मिळावेत, त्यांची गैरसोय दूर व्हावी यासाठी ऑनलाईन पद्धत सुरू केली आहे. तसेच नागरिक ज्या प्रभागात राहतात, त्या परिसरातच त्यांना दाखले मिळावेत, यासाठी प्रभाग कार्यालयात दाखले देण्याची सोय केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जन्म, मृत्यूसह इतर दाखले वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिक करू लागले आहेत. अगदी महिना, पंधरा दिवस, आठ दिवसांपासून चकरा मारत आहोत, तरीही दाखले मिळत नाहीत, असे काही नागरिकांचे म्हणणे आहे. सकाळपासून रांगेत थांबून दुपारपर्यंतही दाखल मिळत नाही. अखेर कर्मचार्यांकडून उद्या, अथवा इतर दिवशी या असे सांगितले जाते. त्यामुळे दिवस तर वाया जातोच, शिवाय पुन्हा हेलपाटेही मारावे लागतात, असा संताप एका नागरिकाने महापालिका प्रशासनाविरोधात व्यक्त केला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
नागरिकांना मारावे लागतात हेलपाटे (Birth and Death Certificates)
वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालून काही तरी मार्ग काढावा, अशीही मागणी नागरिक करत आहेत. दाखल का मिळत नाही? असे विचारले असता सर्व्हर डाऊन असल्याचे सांगितले जाते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ग्रामीण भागातूनही अनेक गर्भवती महिला प्रसुतीसाठी येतात. त्यामुळे जन्म दाखल्यांसाठी ग्रामीण भागातून येणार्या नागरिकांचे प्रमाणही मोठे आहे. त्यांचे काम दिलेल्या वेळेत झाले नाही, तर त्यांना हेलपाटे मारावे लागतात.
पिंपरी चिंचवड येथील एक वृद्ध दाम्पत्य गेल्या चार महिन्यांपासून सावेडी येथील प्रभाग कार्यालयात जुन्या एका कागदपत्रासाठी हेलपाटे मारत आहेत. मात्र, त्यांची कोणाकडूनही दखल घेतल जात नाही. आजही ते काम न होताच माघारी गेले आहेत.
महापालिका प्रशासनाच्या अगदी बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांना जन्म, मृत्यूचे दाखले मिळविताना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. दाखले मिळविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलाही येतात. मात्र, त्यांना तासन् तास उभे राहूनही दाखले दिले जात नाहीत. अनेकदा सर्व्हर डाऊन असल्याने कारण दिले जाते. एखाद्याने गहजब केला तर त्याचे काम तत्काळ केले जाते. इतर मात्र रांगेतच उभे राहून घरी निघून जातात. याकडे वरिष्ठ, लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.
-सोमनाथ कांडके, नागरिक
सध्या येथील नियमित कर्मचारी ‘बीएलओ’ असल्याने ‘एसआयआर’च्या कामावर आहेत. मात्र, येथील काम विस्कळीत होऊ नये, यासाठी इतर काही कर्मचारी आम्ही नियुक्त केले आहेत. आज सर्व्हर डाऊन असल्यामुळे दाखल मिळताना अडचणी आल्या. मात्र, उद्यापासून हा प्रश्न मार्गी लागेल. सर्वांना दाखले मिळतील. आम्ही वैयक्तिक पातळीवर लक्ष देऊन काम करून घेत आहोत.
-गणेश वाकळे, प्रभाग अधिकारी, सावेडी, मनपा, अहिल्यानगर


