
Rohit Pawar : नगर : श्रीरामपूरचा निलंबित (Suspended) पोलीस कर्मचारी शंकर चौधरी हा कुणासाठी ‘कागद’ गोळा करण्याचं काम करत होता? असा संतप्त सवाल रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज (ता. १५) आपल्या एक्स अकाऊंटद्वारे (X Account) केला आहे.
नक्की वाचा : राहाता शहरात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; सीसीटीव्ही बसवण्याची मागणी
गोळीबाराच्या तब्बल चार घटना
या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भगवान प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीरामपूरमध्ये गुन्हेगारीचा कळस झाला असून सामान्य माणसाला जीव मुठीत धरून श्वास घेण्याची वेळ आलीय. गेल्या दोन-तीन आठवड्यात गोळीबाराच्या तब्बल चार घटना घडल्या तर एका हॉटेल व्यावसायिकासह दोन खून झाले आहेत. या प्रकाराने सामान्य माणसासह व्यापारीही भयभीत झाले असून येथील गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी पुकारलेल्या बंदचा आज (ता. १५) चौथा दिवस आहे. यामध्ये शाळाही सहभागी असून विद्यार्थ्यांचंही मोठं नुकसान होत आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
गुन्हेगारीला कुणाचं अभय? (Rohit Pawar)
येथील गुन्हेगारीला कुणाचं अभय आहे? गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला सातत्याने या भागातच पोस्टिंग कशी मिळते? एकाच अधिकाऱ्याला आठ-दहा वर्षे जिल्ह्यात कसं ठेवलं जातं? नुकताच निलंबित केलेला पोलीस कर्मचारी कुणासाठी ‘कागद’ गोळा करण्याचं काम करत होता? याबाबत अनेक रंजक कथा कानावर आल्या आहेत. या सर्व बाबींकडं गांभीर्याने बघून या सर्वांचा ‘आका’ कितीही मोठा असला आणि गुन्हेगारांवर कुणाचाही वरदहस्त असला तरी या सर्व गुन्हेगारांचं कंबरडं मोडण्याची आणि श्रीरामपूरला भयमुक्त करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण याकडं गांभीर्याने लक्ष द्यावं, ही विनंती! असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान रोहित पवार यांनी केलेल्या या पोस्टवर पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


