Sonam Wangchuk : नगर : नीट पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजानामा द्यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) दिल्लीतील जंतर मंतर मैदानालर उपोषणास बसले आहेत. आंदोलनाना १७ दिवस झाले, तरीही सरकारने दखल घेतली नाही. यावरून माजी खासदार तथा शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या आंदोलनाची आठवण सांगितली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २०११ मध्ये लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन केले होते. ते आंदोलन मिटविण्यासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी कशी मध्यस्थी केली, या प्रक्रियेत शेट्टी यांची काय भूमिका होती, याची आठवण शेट्टी यांनी एका पोस्टद्वारे सांगितली आहे.
नक्की वाचा : श्रीरामपूरचा निलंबित पोलीस कर्मचारी कुणासाठी ‘कागद’ गोळा करायचा; रोहित पवार यांचा सवाल
देशमुख यांचा मुंडे यांना फोन
शेट्टी म्हणतात, २०११ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत ‘जन लोकपाल विधेयक’ संमत करावे, या मागणीसाठी रामलीला मैदानावर उपोषण केले होते. मी त्यावेळी लोकसभेचा सदस्य होतो. अण्णा हजारे यांनी केलेली मागणी मान्य करावी म्हणून विरोधी पक्षातील सुषमा स्वराज, अरूण जेटली, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, राजनाथसिंग, कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश कारत, ए. बी. बर्धन, तेलुगु देशम पक्षाचे चंद्राबाबू नायडू, आणि जनता दल युनायटेडचे शरद यादव या नेत्यांनीही संसदेत अण्णांच्या आंदोलनाचा जोरदार आवाज उठवला होता. गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी मी आणि मुंडे बसलो असताना विलासराव देशमुख यांचा मुंडे यांना फोन आला. आपण कुठे आहात, मी आपणास भेटायला येणार आहे असे सांगून आंदोलनाच्या चौथ्या दिवशी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा निरोप घेऊन विलासराव देशमुख हे गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी आले होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
देशमुख व गोपीनाथ मुंडे या दोघांची समन्वयकाची भूमिका (Sonam Wangchuk)
जवळपास दीड ते दोन तास या आंदोलनाबाबत विलासराव देशमुख व गोपीनाथराव मुंडे यांची चर्चा होवून तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा झाली. दोन वेळा विलासराव देशमुखांनी त्याठिकाणाहून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना फोन जोडून दिला.
त्यानंतर पुढील आठ दिवस विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे या दोघांनी समन्वयकाची भूमिका बजावली व सरकारने संसदेत जन लोकपालच्या प्रमुख मागण्यांवर ‘संसद संकल्प’ एकमताने मंजूर केल्यानंतर २८ ऑगस्ट २०११ रोजी संपले. त्यावेळेस अण्णा हजारे यांनी विलासराव देशमुख यांना “सृजन प्रशासक” एक सुसंस्कृत, शब्दाचा पक्का आणि जनभावना समजणारा नेता” म्हणून माध्यमांसमोर आदर व्यक्त केला.
उपोषणाची साधी दखलही घेतली नाही हे लोकशाहीचे दुर्दैव
रॅमेन मॅगेसेस पुरस्कार घेतलेले सोनम वांगचुक १७ दिवस दिल्लीत उपोषण करत आहेत. मनमोहन सिंग यांच्यासारख्या संवेदनशील व विलासराव देशमुख यांच्यासारखे गुण असणारा एकही नेता भाजप पक्षात नाही व एकाही मंत्र्याने या उपोषणाची साधी दखलही घेतली नाही हे लोकशाहीचे दुर्दैव म्हणावे लागेल, असे शेट्टी यांनी म्हटले आहे. यावरून शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे. शेट्टी म्हणाले, नीट पेपर फुटीमुळे २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या करूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाझर फुटत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही केंद्रातील एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याला पाठवून सोनम वांगचूक यांचे उपोषण थांबवावे, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.



