
Bhagwangad : पाथर्डी : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या धाकटी अलंकापुरी श्री क्षेत्र भगवानगडावर (Bhagwangad) देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) भाविकांची अभूतपूर्व गर्दी उसळली. पहाटेपासूनच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (Sri Vitthal-Rukmini Temple) व संत भगवानबाबांच्या समाधी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दिवसभर नामस्मरण, भजन, हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण भगवानगड परिसर दुमदुमून गेला.
नक्की वाचा : पाथर्डीत महावितरणच्या उपअभियंता व वायरमनवर गुन्हा दाखल
भगवानगडची ‘धाकटी अलंकापुरी’ म्हणून ओळख
वारकरी संप्रदायात आषाढी एकादशीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी पंढरपूर येथे लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असले, तरी पंढरपूरला जाणे शक्य नसलेल्या भाविकांसाठी भगवानगड हे ‘धाकटी अलंकापुरी’ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे राज्याच्या विविध भागांतून आलेल्या लाखो भाविकांनी भगवानगडावरील विजयी पांडुरंग व वै. संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपली श्रद्धा व्यक्त केली. यंदा आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविकांसाठी भारजवाडी ग्रामस्थांच्या वतीने शंभर क्विंटल साबुदाण्याच्या फराळाचे अन्नदान करण्यात आले. वारकरी परंपरेतील ही सेवा अनेक वर्षांपासून अखंड सुरू असून, कार्तिकी एकादशीला घोगस पारगाव ग्रामस्थांकडून फराळाचे अन्नदान केले जाते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
भगवानगड वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र (Bhagwangad)
भगवानगडावरील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे संत भगवानबाबांनी वारकरी संप्रदायाच्या भक्तीचा प्रसार करण्यासाठी उभारलेले प्रमुख मंदिर आहे. पश्चिमाभिमुख असलेल्या या मंदिराचे उंच शिखर, सुवर्ण कळस, दगडी कोरीवकाम, गर्भगृहातील देखण्या विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आणि मंदिरासमोरील दगडी कासव भाविकांचे विशेष आकर्षण ठरते. भगवानबाबा समाधी मंदिर, धौम्य ऋषी मंदिर, महारुद्र हनुमान मंदिर आणि जनार्दन स्वामी मंदिर यांमुळे भगवानगड वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.


