
Fertilizer Irregularities Issue : कोपरगाव : ऑनलाइन प्रणाली ई-पॉस मशीनवर (ePoS Machine) खताचा साठा ‘शून्य’ दाखवून गोदामामध्ये रासायनिक युरिया खताची बेकायदेशीर साठेबाजी (Fertilizer Irregularities Issue) करणाऱ्या आणि शेतकऱ्यांना खत न देताच अंगठ्याचे ठसे घेऊन फसवणूक करणाऱ्या ‘मे. मंजूर प्रगत शेतकरी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.’ च्या सचिवांसह जबाबदार व्यक्तीवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात (Kopargaon Taluka Police Station) गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी अधिकारी कार्यालयातील गुण नियंत्रण निरीक्षक गणेश भाऊसाहेब बिरदवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
२३ जुलै २०२६ रोजी दुपारी कोपरगाव कृषी अधिकारी कार्यालयातील गुण नियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी प्राप्त झालेल्या लेखी तक्रारीच्या अनुषंगाने मंजूर (ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला अचानक भेट देऊन तपासणी केली. तपासणीवेळी संस्थेचे सचिव किशोर चंद्रकांत टिळेकर हे उपस्थित होते.तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना खतांच्या विक्रीत व साठ्यात मोठी अनियमितता आढळून आली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
फक्त चलने दाखवून दिशाभूलचा प्रयत्न (Fertilizer Irregularities Issue)
यामध्ये युरिया खताचे साठा पुस्तक (Stock Register) उपलब्ध नव्हते. खरेदी बिले विचारली असता फक्त चलने दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. शासकीय नियमानुसार गोदामात (३८९ गोण्या) इतका युरियाचा संरक्षित साठा असणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत (३५३ गोण्या) साठाच आढळला. म्हणजेच कोणत्याही परवानगीशिवाय ३६ गोण्या युरियाची अनधिकृत विक्री करण्यात आली होती.
परवान्यात नोंद नसलेल्या दुसऱ्या गोदामाची तपासणी केली असता, तेथे IFFCO कंपनीच्या युरियाचा (३५४ गोण्या) अनधिकृत साठा आढळून आला. या ३५४ गोण्यांचा साठा ई-पॉस मशीनवर दिसत नव्हता. अधिकाऱ्यांनी याबाबत जाब विचारला असता, ‘शेतकऱ्यांच्या मदतीने ई-पॉसवरील साठा कमी केला’ अशी कबुली सचिवांनी दिली. सुरुवातीला बिले फाटल्याचे सांगून अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
शासनाची आर्थिक फसवणूक करणे, खताचा अनधिकृत साठा करणे आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याप्रकरणी किशोर चंद्रकांत टिळेकर (सचिव, मु.पो. मंजूर, ता. कोपरगाव) दादासाहेब विठ्ठल मोरे (परवान्यातील जबाबदार व्यक्ती, मु.पो. मंजूर, ता. कोपरगाव) यांच्याविरुद्ध खत नियंत्रण आदेश १९८५ चे कलम तसेच भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करीत आहे.
कृषी निविष्ठांमध्ये कोणतीही अनियमितता, साठेबाजी किंवा शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही. सर्व खत विक्रेत्यांनी ई-पॉस आणि प्रत्यक्ष साठा जुळणारा ठेवावा, अन्यथा अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा कृषी विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.


