Ujani Dam : नगर : उजनी धरणात आज सकाळी १० वाजता ९३.८७ टक्के पाणीसाठा झाल्याने पूर नियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीत एकूण ६,६०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सु. उ. डुंबरे यांनी केले आहे.
नक्की पहा : सोया चाप बॅटर अंगाला लावत कामगाराने बनवला रील
रेड अलर्ट जारी
पुणे जिल्हा व घाटमाथा परिसरासाठी भारतीय हवामान विभागाने आज रेड अलर्ट जारी केला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे तसेच ऊर्ध्व भागातील धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे उजनी धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. दौंड येथील सरिता मापन केंद्रावर सध्या ७०,०८९ क्यूसेक्स पाण्याची आवक असून त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.
नक्की वाचा : पहिल्याच दिवशी रंगले चुरशीचे सामने; तीन विजयांसह आठरे पाटील स्कूलची विजयी सलामी
नागरिकांना सतर्कतेचा इशारा (Ujani Dam)
पूर नियंत्रणाच्या दृष्टीने पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान व धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन आज सकाळी ११ वाजता धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीत ५,००० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच जलविद्युत केंद्रातून १,६०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत असून एकूण ६,६०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सुरू आहे. पावसाचे प्रमाण व धरणात होणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन या विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ अथवा घट होऊ शकते. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा द्यावा, अशी विनंती उजनी धरण व्यवस्थापन विभागाने केली आहे.



