Shevgaon Theft : शेवगाव (Shevgaon) तालुक्यात अलीकडच्या काही महिन्यांपासून चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, चोरट्यांनी नागरिकांची झोप उडवली आहे. दिवस असो वा रात्र, चोरटे कोणत्याही वेळी आपला डाव साधत असल्याने तालुक्यात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, भरदिवसा गजबजलेल्या वस्त्यांमध्येही घरफोड्या होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सोमवारी बोधेगाव येथे भरदिवसा मोठी घरफोडी झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत मंगळवारी शेवगाव शहरातील खंडोबानगर परिसरात आणखी एक चोरीची घटना घडली. या घटनेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल 7 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
चोरट्यांनी दिवसा घराचे कुलुप तोडले (Shevgaon Theft)
याप्रकरणी अजित शिवदास सरोदे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडोबानगर येथील रहिवासी व माजी प्राचार्य शिवदास सरोदे हे पत्नी आणि धाकटा मुलगा अजय यांच्यासह न्यायालयीन कामानिमित्त अहिल्यानगर येथे गेले होते. त्याचवेळी मोठा मुलगा अजित सरोदे हा नेहमीप्रमाणे आखेगाव रोडवरील आपल्या दुकानात गेला होता. तर सून प्रणाली सरोदे या मुलांना शाळेत सोडण्यासाठी सकाळी घराला कुलूप लावून बाहेर पडल्या. मुलांना शाळेत सोडल्यानंतर त्या थेट पतीच्या दुकानात गेल्या. घर पूर्णपणे रिकामे असल्याची माहिती चोरट्यांना मिळाली.
हे वाचा: पारनेरच्या मनसैनिकांचा RTO कार्यालयात ठिय्या आंदोलन काळ्या काचांवर कारवाईसाठी मनसे आक्रमक
लाखोंचा मुद्देमाल चोरला (Shevgaon Theft)
याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटे उघडून त्यांनी मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. कपाटामधून सुमारे 13 तोळे 9.50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने, पाच हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि तीन लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण 7 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरी इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली की, घरातील सदस्य परत येईपर्यंत कोणालाही या घटनेची कल्पना आली नाही.
पोलिसांकडून पुरावे गोळा करण्याचे काम सुरु (Shevgaon Theft)
घरातील सदस्य घरी परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसताच चोरी झाल्याचे उघड झाले. त्यानंतर तातडीने शेवगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळावरील पुरावे संकलित करण्यात आले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यासह संशयितांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.
हेही वाचा: विसापूर कारागृहातून जन्मठेपेच्या शिक्षेतील कैदी पसार; बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शेवगाव शहर आणि तालुक्यात सलग घडणाऱ्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, चोरटे आता रात्रीच्या अंधाराची वाट न पाहता भरदिवसाच घरफोड्या करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिकच तीव्र झाली आहे. बोधेगावातील घरफोडीचा तपास अद्याप सुरू असतानाच खंडोबानगरात घडलेल्या या दुसऱ्या मोठ्या चोरीमुळे पोलिसांसमोर चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरात नियमित पोलिस गस्त वाढवावी, संशयित व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवावे तसेच सीसीटीव्ही यंत्रणा अधिक प्रभावी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नक्की वाचा: कृती सेननने व्यक्त केली या पॅन इंडिया सुपरस्टारसोबत काम करण्याची इच्छा



