Sayaji Shinde: अहिल्यानगर: ग्रामीण भागात दर्जेदार वाचनालयांची कमतरता ही चिंतेची बाब असली, तरी समाजाच्या सहभागातून उभी राहणारी वाचनालय चळवळ ही ज्ञानसमृद्ध समाज घडविण्याचा प्रभावी मार्ग आहे. युवकांनी वाचनालयाचा मनापासून उपयोग करून वाचनाची सवय जोपासली, तर त्यातून व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच समाज परिवर्तनालाही चालना मिळेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते आणि वृक्षदूत सयाजी शिंदे यांनी इंदुरी येथे केले.
हे वाचा: शेवगावमध्ये दिवसा घरफोडी; लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन (Sayaji Shinde)
अकोले तालुक्यातील इंदुरी येथे सोशल नेटवर्किंग फोरम (एसएनएफ) संस्थेच्या वाचनालय चळवळीअंतर्गत उभारण्यात आलेल्या 37 व्या वाचनालयाचे उद्घाटन अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री राहीबाई पोपेरे, सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड, जीवन सोनवणे तसेच आर्गानो कंपनीचे योगेश डागा उपस्थित होते.
सोशल मीडियाच्या पलीकडे जाऊन पुस्तकांशी मैत्री करा (Sayaji Shinde)
यावेळी उद्घाटनप्रसंगी बोलताना सयाजी शिंदे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि युवकांसाठी वाचनालयांचे महत्त्व अधोरेखित केले. माहितीच्या या युगात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या पलीकडे जाऊन पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वाचनामुळे विचार करण्याची क्षमता वाढते, व्यक्तिमत्त्व घडते आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद निर्माण होते, असेही त्यांनी नमूद केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी सोशल नेटवर्किंग फोरमच्या वाचनालय चळवळीचे कौतुक केले. प्रमोद गायकवाड यांच्या संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षांपासून संस्था आदिवासी आणि ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील मुलांपर्यंत दर्जेदार पुस्तके आणि अभ्यासाची साधने पोहोचविण्याचे हे काम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गावागावांत वाचन संस्कृती रुजावी
प्रास्ताविकात संस्थापक प्रमोद गायकवाड यांनी वाचनालय चळवळीमागील उद्देश स्पष्ट केला. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना आधार मिळावा तसेच गावागावांत वाचन संस्कृती रुजावी, या उद्देशाने संस्था सातत्याने नवीन वाचनालये सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले. या वाचनालयाच्या उभारणीसाठी सोशल नेटवर्किंग फोरमच्या कार्यकर्त्यांसह ग्रामपंचायत इंदुरी, जिल्हा परिषद शाळा, मविप्र प्रवरा विद्यालय, विठ्ठल मंदिर देवस्थान आणि ग्रामस्थांनी सक्रिय सहकार्य केले. त्यांच्या सामूहिक सहभागामुळे हा उपक्रम यशस्वीपणे साकार झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
नक्की वाचा: श्रीरामपूरात अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; १३ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश नवले यांनी केले, तर आभार प्रदर्शन अशोक नवले यांनी मानले. यावेळी आर्गानोचे मधू सेरी, योगेश कासट, रवी ठोंबाडे, विजया ठोंबाडे यांच्यासह सोशल नेटवर्किंग फोरमचे पदाधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि वाचनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंदुरी येथे सुरू झालेल्या या नव्या वाचनालयामुळे परिसरातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे युवक आणि वाचनाची आवड असलेल्या नागरिकांना दर्जेदार पुस्तके उपलब्ध होणार असून, ग्रामीण भागात ज्ञानाची नवी चळवळ अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अवश्य वाचा: कर्जमाफीच्या ई-केवायसीसाठी शुल्क आकारू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश



