Kalsubai Landslide: कळसूबाई शिखराच्या एका भागाचे भुस्खलन; मोठी दुर्घटना टळली, गांगडवाडीचे मोठे नुकसान

अकोले तालुक्यातील गांगडवाडी येथे कळसूबाईच्या पश्चिम उतारावर भीषण भूस्खलन होऊन 30 ते 40 एकर भातशेतीचे नुकसान झाले. माती-दगडांचा महाप्रवाह गावाच्या उंबरठ्यावर थांबल्याने 25 आदिवासी कुटुंबे बचावली.

0
Kalsubai Landslide: कळसूबाई शिखराच्या एका भागाचे भुस्खलन; मोठी दुर्घटना टळली, गांगडवाडीचे मोठे नुकसान AI Generated Image
Kalsubai Landslide: कळसूबाई शिखराच्या एका भागाचे भुस्खलन; मोठी दुर्घटना टळली, गांगडवाडीचे मोठे नुकसान AI Generated Image

Kalsubai Landslide : अहिल्यानगर: अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कळसूबाई शिखर परिसरात भीषण भूस्खलन (Kalsubai Landslide) झाले आहे. गांगडवाडी येथील कळसूबाईच्या पश्चिम उतारावरील डोंगराचा मोठा भाग कोसळल्याने माती, दगड, झाडे आणि बंधारे तब्बल एक किलोमीटरपर्यंत घसरत खाली आले. या भूस्खलनामुळे परिसरातील नैसर्गिक जलप्रवाह बदलला आणि पुराचे पाणी थेट भातशेतीत शिरल्याने सुमारे 30 ते 40 एकर क्षेत्रावरील भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

हे वाचा: ‘मराठा समाजासाठी जेवढे निर्णय घेतले आहेत ते कोणत्याही सरकारने घेतले नाहीत’ – देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत काही क्षणांत मातीमोल (Kalsubai Landslide)

भूस्खलनामुळे डोंगरावरून आलेल्या माती आणि दगडांच्या महाप्रवाहाने अनेक शेतांमध्ये चिखलाचा जाड थर साचला आहे. काही ठिकाणी शेतीची मूळ रचना पूर्णपणे बदलून गेली असून बांध, पाण्याचे मार्ग आणि लागवड केलेले क्षेत्र ओळखूही येत नाही. अनेक शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत काही क्षणांत मातीमोल झाली.

25 आदिवासी कुटुंबे मोठ्या संकटातून बचावली (Kalsubai Landslide)

या दुर्घटनेतील दिलासादायक बाब म्हणजे डोंगरावरून आलेला माती-दगडांचा प्रचंड प्रवाह गांगडवाडी गावाच्या उंबरठ्यावर येऊन थांबला. त्यामुळे गावातील सुमारे 25 आदिवासी कुटुंबे संभाव्य मोठ्या संकटातून बचावली. हा प्रवाह काही अंतर पुढे गेला असता मोठी जीवितहानी झाली असती. त्यामुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

एका क्षणात सर्व काही संपले (Kalsubai Landslide)

भात लागवडीचा हंगाम पूर्ण झाल्यानंतर चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र अचानक झालेल्या भूस्खलनाने सर्व आशा धुळीस मिळाल्या. “मोठ्या कष्टाने भाताची लागवड केली होती. आता पीक जोमात येईल, अशी अपेक्षा होती. पण एका क्षणात सर्व काही संपले. पीकच नाही तर शेताची ओळखही राहिली नाही,” अशी व्यथा अशोक उघडे, ढवळा उघडे आणि बुधा उघडे या ग्रामस्थांनी व्यक्त केली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात माती आणि दगड साचल्याने पुढील लागवड करणेही कठीण झाले आहे. शेती पूर्ववत करण्यासाठी मोठा खर्च अपेक्षित असून तो सर्वसामान्य आदिवासी शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

नक्की वाचा: अभिनेते सयाजी शिंदेंच्या हस्ते इंदुरी येथील वाचनालयाचे उद्घाटन

रामनाथ उघडे, लक्ष्मण उघडे, धोंडू उघडे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच भूस्खलनामुळे उद्ध्वस्त झालेली शेती पूर्ववत करण्यासाठी विशेष योजना राबवावी, जेसीबीच्या साहाय्याने शेतातील माती आणि दगड हटवावेत तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, महसूल आणि कृषी विभागाने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. कळसूबाई परिसरातील डोंगराळ भागात अद्याप पावसाचा जोर कायम असल्याने आणखी भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासनाने सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

नक्की वाचा: राज्यसभेत वंदे मातरम विधेयक मंजूर; अपमान केल्यास होणार ३ वर्षांची शिक्षा