Archaeology Department : दिल्ली वेस परिसरातील खोदकाम तात्काळ थांबवा; पुरातत्त्व विभागाचे श्रीगोंदा नगरपरिषदेला आदेश, कारवाईचा अहवालही मागविला

Archaeology Department : दिल्ली वेस परिसरातील खोदकाम तात्काळ थांबवा; पुरातत्त्व विभागाचे श्रीगोंदा नगरपरिषदेला आदेश, कारवाईचा अहवालही मागविला

0
Archaeology Department : दिल्ली वेस परिसरातील खोदकाम तात्काळ थांबवा; पुरातत्त्व विभागाचे श्रीगोंदा नगरपरिषदेला आदेश, कारवाईचा अहवालही मागविला
Archaeology Department : दिल्ली वेस परिसरातील खोदकाम तात्काळ थांबवा; पुरातत्त्व विभागाचे श्रीगोंदा नगरपरिषदेला आदेश, कारवाईचा अहवालही मागविला

Archaeology Department : नगर : श्रीगोंदा शहरातील ऐतिहासिक दिल्ली वेस परिसरात सुरू असलेल्या कथित अनधिकृत खोदकामाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या नाशिक विभागाने श्रीगोंदा नगरपरिषदेला तात्काळ नोटीस बजावली आहे. दिल्ली वेस परिसरातील सुरू असलेले खोदकाम तातडीने थांबवून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी तसेच केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल तात्काळ सादर करावा, असे निर्देश पुरातत्त्व विभागाने (Archaeology Department) दिले आहेत. 

शिवदुर्गच्या तक्रारीची दखल

शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनने २९ जुलै रोजी केलेल्या तक्रारीची दखल घेत पुरातत्त्व विभागाने ही कारवाई केली आहे. विभागाच्या नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे, दिल्ली वेस या ऐतिहासिक स्मारकाच्या पायथ्याशी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली असून, त्यामुळे स्मारकाच्या पाया व संरचनात्मक स्थैर्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच स्मारकाच्या मूळ वास्तुरचनेचे अपरिवर्तनीय नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

पुरातत्त्व विभागाने आपल्या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे की, दिल्ली वेस हे पुरातत्त्वीय, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असंरक्षित स्मारक असून, श्रीगोंदा शहरातील पानिपत युद्धाच्या स्मृतींशी निगडित महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वारसा आहे. या स्मारकास राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू असल्याने त्याच्या मूळ स्वरूपाला बाधा पोहोचेल किंवा कोणत्याही प्रकारची हानी होईल, अशी कोणतीही कृती अत्यंत गंभीर स्वरूपाची मानली जाईल, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

श्रीगोंदा नगरपरिषदेच्या कारवाईकडे लक्ष (Archaeology Department)

याशिवाय, सन १९८२ च्या शासन परिपत्रकाचा उल्लेख करत पुरातत्त्व विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांवर ऐतिहासिक स्मारकांचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र, राज्य अथवा असंरक्षित स्मारकांच्या परिसरात कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना शासनाने यापूर्वीच दिल्या असल्याचेही नोटीसमध्ये म्हटले आहे. दरम्यान, शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनने दिल्ली वेस परिसरातील खोदकाम तातडीने बंद करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून दिल्ली वेसचे जतन व संवर्धन तसेच राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी संस्था शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे संस्थेने सांगितले आहे. पुरातत्त्व विभागाच्या या नोटीसमुळे दिल्ली वेस परिसरातील खोदकाम प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, आता श्रीगोंदा नगरपरिषद व स्थानिक प्रशासन पुढील काय कारवाई करते? याकडे इतिहासप्रेमींसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.