Robbery : नगर : संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे (हरीबाबावाडी) येथे झालेल्या सशस्त्र दरोड्याचा (Robbery) छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (Local Crime Branch) यश आले असून या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, मुख्य आरोपी अक्षय उंबऱ्या काळे हा मोक्का कायद्यासह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये (Serious Crimes) फरार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईत चोरीतील दागिने विकत घेतल्याप्रकरणी एका सराफालाही ताब्यात घेण्यात आले आहे. अक्षय उंबऱ्या काळे (वय २६) व तेजस सगडया काळे (वय १९, दोघेही रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा) हे वाघुंडे (ता. पारनेर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
पाच जणांच्या टोळीकडून घरात घुसून दरोडा
१२ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गणेश गोकुळ चव्हाण यांच्या वेल्हाळे येथील घरी पाच जणांच्या टोळीने घरात घुसून दरोडा टाकला होता. या वेळी चव्हाण यांच्या भावावर लोखंडी कुऱ्हाडीने वार करण्यात आला. तसेच कुटुंबातील सदस्यांना मारहाण करून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि दोन मोबाईल असा सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे तपास (Robbery)
या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान अक्षय उंबऱ्या काळे (वय २६) व तेजस सगडया काळे (वय १९, दोघेही रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा) हे वाघुंडे (ता. पारनेर) येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत अक्षय काळे याने आपल्या साथीदारांसह हा दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्याने सगडया उंबऱ्या काळे, शरद कैलास काळे, आवेश मिरफा भोसले आणि प्रथमेश उर्फ छोटू मिरफा भोसले हे साथीदार अद्याप फरार असल्याची माहिती दिली.
तपासात आरोपींनी यापूर्वी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरफोडीच्या गुन्ह्यातही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने पारनेर येथील शैलेंद्र चंद्रकांत डहाळे याला विकल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस तपासात मुख्य आरोपी अक्षय उंबऱ्या काळे याच्याविरुद्ध अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, घरफोडी तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यासह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो त्या प्रकरणांतही फरार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तेजस सगडया काळे याच्याविरुद्धही यापूर्वी गंभीर गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये तसेच त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाणे करीत आहे.



