Bhingar Camp Police Station : नगर : नगर-जामखेड रस्त्यावरील वृंदावन मंगल कार्यालयासमोर झालेल्या रस्तालूट प्रकरणातील फरार आरोपीला (Absconding Accused) भिंगार कॅम्प पोलिसांनी (Bhingar Camp Police Station) तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे अटक केली. महादेव अप्पासाहेब घावटे (वय ३२, रा. मांडवे, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे (Accused) नाव आहे.
अडवून शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण
या प्रकरणात २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे ३.४५ वाजण्याच्या सुमारास नगर-जामखेड रस्त्यावरील वृंदावन मंगल कार्यालयासमोर फिर्यादीला महादेव व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी अडवून शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीकडील रोख रक्कम, सोन्याचे दागिने तसेच तयार कोळसा बळजबरीने लुटून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पाठलाग करून घेतले ताब्यात (Bhingar Camp Police Station)
गुन्ह्याचा तपास सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी तीसगाव (ता. पाथर्डी) येथील उसाच्या शेतात लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कॅम्प पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तातडीने सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान महादेव अप्पासाहेब घावटे याने गुन्ह्याची कबुली दिल्याने रस्तालूट प्रकरणाचा उलगडा झाला. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलिसांकडून सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार तसेच पोलीस अंमलदार दीपक शिंदे, रविंद्र टकले, रामनाथ डोळे, कैलास शिरसाठ, प्रमोद लहारे, वैभव झिने आणि दक्षिण मोबाईल सेलचे अरुण सांगळे यांच्या पथकाने केली.



