Abhijeet Dipke : जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल

0
Abhijeet Dipke : जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Abhijeet Dipke : जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल

नगर : सुशिक्षित बेरोजगारांपैकी ८० टक्के लोकांकडे पदव्या आहेत. देशातील तरुणांना वाटत आहे की, आम्ही शिकून काही चुकी केली आहे का? कारण ज्या लोकांनी कधी फॉर्मल डिग्री (Formal Degree) घेतली नाही ते सरकार चालवतात, निर्णय घेतात, पण ज्या तरुणांनी लहानपणापासून मेहनत केली, डिग्री घेतली, त्यांना असं वाटतंय की, आम्ही डिग्री घेऊन चुकी केली. कारण आमचं भविष्य अशिक्षित लोक ठरवत आहेत, अशा शब्दात काॅकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके (Abhijeet Dipke) यांनी हल्लाबोल केला. बेरोजगारी हा आता निवडणुकीचा आणि राजकीय चर्चेचा मुख्य मुद्दा बनवायचा आहे, ज्याला कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

नक्की वाचा : ‘नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही’ – तुकाराम मुंढे

“काशीची काशी झालेली आहे” (Abhijeet Dipke)

अभिजित दिपके म्हणाले, तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की कुठली एक ऑर्गनायझेशन किंवा कुठला एक व्यक्ती सगळे प्रॉब्लेम सोडवेल, तर तो तुमच्याशी खोटं बोलत आहे. २०१४ मध्ये देशाशी असेच खोटे बोलण्यात आले होते की, एक व्यक्ती देश बदलू शकेल, पण प्रत्यक्षात “काशीची काशी झालेली आहे” असा टोला त्यांनी लगावला. कोणताही एक व्यक्ती किंवा संस्था देशाचे सर्व प्रश्न सोडवू शकत नाही, म्हणूनच ज्या संघटनांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि सिव्हिल सोसायटीने पाठिंबा दिला, त्या सर्वांशी एकत्र येऊन एकजूट करण्यात येईल. आता देशाला सगळ्यांनी आपल्या राजकीय विचारसरणीच्या वर उठून, “नागरिक म्हणून एकत्र येऊन देशात सुधार आणायची गरज आहे” असे त्यांनी सांगितले.

अवश्य वाचा : राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेला विरोध का? खंडपीठातील याचिकेमागचे कारण काय?

अभिजित दिपके पुढे म्हणाले की, कॉकरोच जनता पार्टी येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात “क्या बोलती पब्लिक” हे राष्ट्रीय अभियान सुरू करणार आहे, जो एक देशव्यापी दौरा असेल. या कॅम्पेनमधून आम्ही देशभरात दौरा करणार आहे, आम्ही लोकांकडून समजून घेणार आहे, त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत. कारण सध्याचे सत्ताधारी आणि राजकीय पक्ष लोकांपासून पूर्णपणे “डिस्कनेक्ट” झाले आहेत आणि लोकांचे ऐकून घेण्यास तयार नाहीत आणि आपल्याला दुर्लक्षित केलं जात असल्याची भावना लोकांमध्ये झाल्याचे ते म्हणाले.  

‘देशात शिक्षण घेणं म्हणजे डोक्यावर कर्ज ठेवण्यासारखं झालंय’ (Abhijeet Dipke)

दीपके पुढे म्हणाले, सरकारला फक्त एकच मुद्दा दिसतो, तो म्हणजे हिंदू-मुसलमानचा. पण बेरोजगारी, देशाची आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाची किती वाईट अवस्था आहे, यावर कोणीच काही बोलायला तयार नाही.आज आपल्या देशात शिक्षण न परवडणारे झालं आहे. पहिली-दुसरीच्या मुलांसाठी वर्षाची फी एक-दीड लाख आहे, आणि प्रायव्हेट शाळांमधील डोनेशन वेगळेच. कॉलेजच्या वाढलेल्या फी आणि कोचिंग क्लासेसमुळे सामान्य पालकांवर प्रचंड बोजा पडत आहे. आजच्या काळात आपल्या देशात शिक्षण घेणं म्हणजे डोक्यावर कर्ज ठेवणं आहे.