Nilesh Lanke | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने न्याय्य मोबदला मिळावा तसेच अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरातील सुमारे १ हजार एकर शासकीय जमिनीवर लॉजिस्टिक पार्क अथवा एमआयडीसीच्या धर्तीवर औद्योगिक प्रकल्प उभारण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नक्की वाचा : जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
आर्थिक व्यवहार ठप्प (Nilesh Lanke)
निवेदनात खासदार लंके यांनी नमूद केले आहे की, सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेमुळे अनेक शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर महामार्गाची नोंद झाली असून त्यामुळे कर्जप्रकरणे, जमीन खरेदी-विक्री, वाटणी तसेच इतर आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक बाधित शेतकऱ्यांना अद्यापही योग्य मोबदला मिळालेला नसल्याने त्यांच्यामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
अवश्य वाचा : कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याने मनोज जरांगे आक्रमक, सरकारवर केले ‘हे’ गंभीर आरोप
युवक-युवतींना रोजगाराच्या संधी (Nilesh Lanke)
महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनींसह घरे, विहिरी, गोठे, झाडे व इतर स्थावर मालमत्तेचे पारदर्शक पद्धतीने योग्य मूल्यांकन करून त्यांना तातडीने न्याय्य मोबदला देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. याशिवाय अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरातील सुमारे एक हजार एकर शासकीय जमीन औद्योगिक विकासासाठी वापरून तेथे लॉजिस्टिक पार्क किंवा एमआयडीसीच्या धर्तीवर औद्योगिक प्रकल्प उभारल्यास अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होईल आणि हजारो युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही खासदार लंके यांनी निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान, अहिल्यानगर–मनमाड रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याबद्दलही त्यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांचे लक्ष वेधले. अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली असून वारंवार अपघात होत असल्याने संबंधित यंत्रणेला निर्देश देऊन हे काम दर्जेदार व जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.
महामार्गात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला, अहिल्यानगर-मनमाड रस्त्याच्या कामाला गती आणि चिचोंडी पाटील येथे औद्योगिक प्रकल्प उभारणी या तिन्ही विषयांवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती खासदार डॉ. निलेश लंके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.



