Ahilyanagar Collector Office | नगर : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची जिल्ह्यातील अंमलबजावणी, त्यावरील खर्च आणि निधीचा वापर याचा आढावा घेण्यासाठी विधिमंडळाची अंदाज समिती गुरुवारी (ता. ६) अहिल्यानगरमध्ये दाखल झाली. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात ( Ahilyanagar Collector Office ) झालेल्या बैठकीत अनेक विभाग आणि महापालिका प्रशासनाच्या कामकाजाचा प्राथमिक आढावा घेण्यात आला. या आढाव्यात अनेक त्रुटी व काही कामांतील अनियमितता निदर्शनास आल्याचे समितीने नमूद केले. विविध योजनांच्या अंमलबजावणीत आवश्यक बदल करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
नक्की वाचा : जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
वाळू धोरणाचा मुद्दा विशेष चर्चेत ( Ahilyanagar Collector Office )
बैठकीत वाळू धोरणाचा मुद्दा विशेष चर्चेत राहिला. वाळूतून अवघा पाच कोटी रुपयांचा महसूल मिळवण्यासाठी शंभर कोटी रुपयांचे रस्ते खराब करायचे का?” असा थेट सवाल समितीने उपस्थित केला. सर्वसामान्यांना वाळू मोफत उपलब्ध करून देण्याचा विचार करावा, तसेच मोठ्या ट्रकऐवजी लहान वाहनांतून वाहतूक केल्यास रस्त्यांचे नुकसान टाळता येईल, असे मत समितीने व्यक्त केले.
अवश्य वाचा : कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याने मनोज जरांगे आक्रमक, सरकारवर केले ‘हे’ गंभीर आरोप
विविध विकासकामे व प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करणार ( Ahilyanagar Collector Office )
जिल्ह्यात दररोज सुमारे ४७ लाख लीटर दूध संकलन होत असल्याचा उल्लेख करत समितीने या कामगिरीचे कौतुक केले. इतर जिल्ह्यांनीही किमान चार ते पाच लाख लीटर दूध संकलनाचे उद्दिष्ट गाठावे, यासाठी राज्य शासनाकडे समितीच्या वतीने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
बैठकीच्या पहिल्या दोन तासांत कृषी विभाग आणि महापालिका प्रशासनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध कामांतील त्रुटी व अनियमिततेची नोंद करण्यात आली असून, यासंदर्भातील अहवाल विधिमंडळात सादर केला जाणार आहे. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची साक्षही नोंदविण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले. समिती शुक्रवारी जिल्ह्यातील विविध विकासकामे व प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे.
विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस समिती सदस्य सदाभाऊ खोत, मंदा म्हात्रे, श्रीकृष्ण कोपडे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी पंकज आशिया, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महापालिका आयुक्त यशवंत डांगे तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी बैठकीस उपस्थित होते. समितीचा अहिल्यानगर दौरा दोन दिवसांचा असून गुरुवारी सर्किट हाऊस येथे समितीचे आगमन झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली.



