
Sangamner : नगर : नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग सरळ व्हावा याकरता संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिकांनी एकत्र येत तीन तास ठिय्या आंदोलन केले. नागरिक महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे घोषणांच्या निनादात तीन तास चक्काजाम आंदोलन झाले. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या हायस्पीड रेल्वे मार्गाकरता केंद्र व राज्य सरकारच्या सर्व मंजुरी मिळालेल्या असताना हे चांगले काम थांबले कसे? असा सवाल करत रेल्वेचे काम थांबले तेथूनच काम सुरू करा, असे आवाहन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्र व राज्य सरकारला केले असून नाशिक पुणे रेल्वे ही सरळ मार्गे झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली आहे.
नक्की वाचा : अखेर जखमी महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; तीन दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली
रिमझिम पावसामध्ये तीन तास ठिय्या
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे सर्वपक्षीय नागरिक महिला युवक विद्यार्थी शेतकरी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भव्य रास्ता रोको झाला. तीन तास झालेल्या या रास्ता रोको साठी संगमनेर अकोल्यातून अनेक नागरिक उपस्थित होते. रेल्वे आमच्या हक्काची , नाशिक पुणे सरळ रेल्वे झालीच पाहिजे या घोषणांनी परिसर दुमदुमला. रिमझिम पावसामध्ये ही हजारो नागरिक तीन तास रस्त्यावर बसून होते.
हेही पहा : रस्त्यात खड्डे की खड्डयात रास्ता; शाळकरी मुलींचा व्हिडीओ व्हायरल
चांगल्या कामात कोणाचा खोडा? (Sangamner)
याप्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाशिक पुणे सरळ रेल्वे करता आपण सातत्याने पाठपुरावा केला. 2019 मध्ये सरकार सत्तेवर आल्यानंतर अधिक पाठपुरावा करताना स्वर्गीय अजितदादा पवार यांनी सुद्धा यामध्ये मदत केली. केंद्र सरकार, नीती आयोग, राज्य सरकार, रेल्वे या सर्व विभागांच्या या सरळ मार्गासाठी मान्यता मिळालेले आहेत. राज्य सरकारने 1000 कोटी रुपये रेल्वेला दिले त्यानंतर भूसंपादन सुरू झाले. गोल्डन ट्रँगल साठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सरळ रेल्वे मार्गाचे काम थांबण्याचे काय कारण आहे ते कळत नाही. या अत्यंत चांगल्या कामात कुणी खोडा घातला. हा सवाल करताना सर्व मंजू-या मिळताना जीएमआरडी ची कोणतीही अडचण आली नव्हती. आताच अडचण आली कशी? असा प्रश्न त्यांनी केला.
यावेळी पद्मश्री रघुवीर खेडकर, डॉ. सुधीर तांबे, जयश्री थोरात, प्रा. हिरालाल पगडाल, रामहरी कातोरे, छात्र भारतीचे अनिकेत घुले, डॉ कोल्हे, अमर कतारी, विश्वासराव मुर्तडक, सिताराम राऊत, उत्कर्षा रूपवते, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे यांच्यासह संगमनेर तालुक्यातील व शहरातील हजारो नागरिक महिला युवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


