Dheeraj Pardeshi Death Case : कामकाज बंद ठेवण्याची महापालिका कामगार युनियनची घोषणा; धीरज परदेशी मृत्यू प्रकरण

सर्व आरोपींना अटक होईपर्यंत मनपाचे कामकाज बंद ठेवण्याची कामगार युनियनची घोषणा

0
Dheeraj Pardeshi Death Case : कामकाज बंद ठेवण्याची महापालिका कामगार युनियनची घोषणा; धीरज परदेशी मृत्यू प्रकरण
Dheeraj Pardeshi Death Case : कामकाज बंद ठेवण्याची महापालिका कामगार युनियनची घोषणा; धीरज परदेशी मृत्यू प्रकरण

Dheeraj Pardeshi Death Case : नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या (Ahilyanagar Municipal Corporation) विद्युत विभागातील कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर तीन दिवसांपूर्वी मुकुंदनगर परिसरात प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धीरज परदेशी (Dheeraj Pardeshi) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने महापालिका कर्मचारी वर्गामध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून, अहिल्यानगर महानगरपालिका कामगार युनियनच्या (Workers’ Union) वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मनपा कामगार युनियनने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले असून, पाणीपुरवठा व आरोग्यसेवा वगळता इतर सर्व नागरी सुविधा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच मुकुंदनगर परिसरातील सर्व नागरी सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय युनियनच्या वतीने घेण्यात आला आहे.

नक्की वाचा : ‘चक्काजाम’ सर्वपक्षीय नव्हे, एका कुटुंबापुरते मर्यादित : आमदार खताळ

मुकुंदनगरमधील नागरी सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय

कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत धीरज परदेशी यांच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील. मुकुंदनगर परिसरातील पोलीस चौकीमध्ये नियमितपणे पोलीस कर्मचारी उपलब्ध नसल्याने तसेच मनपा कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी आवश्यक संरक्षणाची हमी मिळत नसल्याने मुकुंदनगरमधील नागरी सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगार युनियनच्या म्हणण्यानुसार, धीरज परदेशी यांच्यावर सात ते आठ जणांनी हल्ला केला होता. या प्रकरणात पोलीस प्रशासनाने आतापर्यंत चार आरोपींना अटक केली असून, उर्वरित तीन ते चार आरोपी अद्याप फरार आहेत. जोपर्यंत या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत महापालिकेचे कामकाज बंद ठेवण्यात येईल, अशी भूमिका युनियनने घेतली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे (Dheeraj Pardeshi Death Case)

महापालिका कर्मचारी जीव धोक्यात घालून शहरातील नागरिकांना विविध नागरी सुविधा पुरविण्याचे काम करतात. मात्र कामाच्या ठिकाणीच कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होत असतील, तर कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सेवा कशा द्यायच्या, असा सवाल कामगार संघटनेने उपस्थित केला आहे. कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे, यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. मुकुंदनगर परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षणाची हमी मिळाल्याशिवाय त्या परिसरात नागरी सुविधा पुरविण्यासाठी कर्मचारी पाठविले जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका युनियनने घेतली आहे. यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, सेक्रेटरी आनंदराव वायकर, शेखर देशपांडे, विजय कोतकर, सोनू चौधरी, सतीश ताठे, विकास गीते, राजू लयचेट्टी, बाळासाहेब विधाते आदींसह मनपा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते