
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळांच्या जतन-संवर्धनासह नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामांचा आढावा
Dr. Pankaj Ashiya : अहिल्यानगर : चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळांचे जतन व संवर्धन तसेच नाशिक कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela Nashik 2027) पार्श्वभूमीवर शिर्डी (Shirdi) व शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) येथे प्रस्तावित विविध विकासकामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी दिले.
दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठक
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत चौंडी, शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथील विविध विकासकामांचे नियोजन, प्रस्तावित कामांची सद्यस्थिती आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाही याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
प्रस्तावित विकासकामांचा घेतला आढावा (Dr. Pankaj Ashiya)
चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळांचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित विविध कामांचा तसेच प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित विकासकामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. स्मृतीस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक नियोजन करून कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तसेच पुतळा उभारणीसाठी समिती स्थापन करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. प्रस्तावित आराखड्यासाठी आवश्यक जागा भूसंपादित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिल्या. नाशिक कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधांची कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. भाविकांची वाहतूक, वाहनतळ, रस्ते आणि इतर नागरी सुविधांचे योग्य नियोजन करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
संभाजीनगर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातून शिर्डी व शनिशिंगणापूरकडे येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक पार्किंगची जागा निश्चित करून त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. घोडेगाव एमआयडीसी परिसरात पार्किंगसाठी किती जमीन उपलब्ध होऊ शकते तसेच त्या ठिकाणी किती वाहनांची पार्किंग क्षमता निर्माण करता येईल, याची प्रत्यक्ष खातरजमा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
शिर्डी नगरपरिषद अंतर्गत शहरातील रस्त्यांची प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करावीत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या इतर विकासकामांचीही पाहणी करून त्यांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


