
अहिल्यानगर : जिल्ह्यातील (Ahilyanagar News) कर्जुने खारे येथील ‘देवराम गंगाराम शेळके पाटील माध्यमिक विद्यालयात’ नुकताच शाळेतील विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने एक स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम पार पडला. या उपक्रमात याच शाळेच्या माजी विद्यार्थ्याने शाळेतील विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी असं एक पाऊल टाकलं की, जे आज त्या शाळेतील मुलींसाठी वरदान ठरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.आपल्या शाळेतील मुलींच्या आरोग्याची गरज ओळखून त्यांनी शाळेला सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन भेट (Sanitary pad vending machine gifted) म्हणून दिली आहे.
नक्की वाचा : ११ ऑगस्टपासून दुधाच्या दरात वाढ! १ लिटरसाठी किती रुपये मोजावे लागणार?
नेमकं काय घडलं? (Ahilyanagar News)

कर्जुने खारे येथील देवराम गंगाराम शेळके पाटील माध्यमिक विद्यालय कृष्णप्रित वेलफेअर फाऊंडेशन, कृष्णाली फाऊंडेशन आणि होगानस इंडिया प्रा. लि. यांच्या सीएसआर सहकार्याने स्वास्थ्य सखी महिला स्वच्छता जनजागृती व आरोग्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे १५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे कृष्णप्रित वेलफेअर फाऊंडेशनचे संचालक प्रशांत पाटील शेळके. ते स्वतः याच शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.
शाळेचा माजी विद्यार्थी विद्यार्थीनींसाठी ठरला ‘पॅडमॅन’ (Ahilyanagar News)
आपल्या शाळेतील लहान बहिणींच्या आणि मुलींच्या आरोग्याची गरज ओळखून त्यांनी शाळेला सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, वापरलेल्या पॅड्सची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन आणि विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड्स भेट दिले. माजी विद्यार्थ्याने दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीमुळे ते आज खऱ्या अर्थाने “विद्यार्थिनींचे पॅडमॅन” ठरले आहेत! या सुविधेमुळे आता मुलींना शाळेतच स्वच्छ व वैज्ञानिक पद्धतीने सॅनिटरी पॅड्स उपलब्ध होणार असून वापरलेल्या पॅडची स्वच्छ व वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे.
अवश्य वाचा : दीपिका पदुकोणची ‘मीनम्मा’ आठवतेय? चित्रपटाची जान बनलेले ५ भन्नाट अन् आयकॉनिक संवाद!
या कार्यक्रमात सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी छाया निमसे आणि डॉ. पल्लवी जाधव यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळीबाबत माहिती दिली. मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीरातील नैसर्गिक जैविक प्रक्रिया असून त्याबाबत असलेले अंधश्रध्दा, गैरसमज आणि लाज-भीती दूर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. योग्य स्वच्छता, संतुलित आहार, नियमित सॅनिटरी पॅडचा वापर आणि आरोग्याची काळजी याबाबत त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक गोडे सर यांनी यावेळी सांगितले की, “आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी प्रशांत पाटील शेळके यांनी आपल्या शाळेतील मुलींसाठी महत्त्वाचा आणि उपयुक्त उपक्रम राबवून सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. मुलींच्या आरोग्यासाठी हा उपक्रम दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला उद्योजक संजय शिंदे, कृष्णाली फाऊंडेशनचे खजिनदार अमर बोबडे, सदस्य सुनिल शेळके यांसह अनेकजण उपस्थित होते.


