
MLA Rohit Pawar : नगर : कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) तालुक्यात जल जीवन मिशनअंतर्गत (Jal Jeevan Mission Yojana) झालेल्या कामांमध्ये अनेक अनियमितता असून, काही ठिकाणी कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी केला. या प्रश्नांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही त्यावर ठोस कार्यवाही झाल्याचे समोर आले नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
अनेक विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी अदींसह अनेक विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
निकृष्ट कामांबाबत प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी (MLA Rohit Pawar)
यावेळी अनेक योजनेतील प्रलंबित कामांचा मुद्दा चर्चेत आला. काही गावांमध्ये पाइपलाइनसाठी खोदकाम अपेक्षेप्रमाणे झाले नसून, विहिरीच्या रिंगच्या कामात माती आढळून आल्याचे पवार यांनी सांगितले. निकृष्ट कामांबाबत प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही त्याचे पुढे काय झाले, याबाबत माहिती मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी जिल्ह्यात अनेक योजना असून, त्यांची सुमारे ११५ कोटी रुपयांची बिले प्रलंबित असल्याचे सांगितले. निधीअभावी काही कामांना अडथळे येत असले तरी पूर्ण झालेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत तपासणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जल जीवन योजनेशी संबंधित कामांमध्ये पूर्वीचे अधिकारी निलंबित झाले असून सध्या नवीन अधिकारी कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, बेळगाव व हंडळवाडी येथे जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, या गावांतील नागरिकांनी अद्याप एक थेंबही पाणी मिळाले नसल्याचे बैठकीत सांगितले. योजना पूर्ण व हस्तांतरित झाल्याचे सांगून प्रशासन नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यावर भंडारी यांनी प्रत्यक्ष झालेल्या कामांची तपासणी करून वस्तुस्थिती जाणून घेण्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्ह्यातील सरपंच व प्रशासकांची बैठक घेऊन जल योजनेचा आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. कर्जत-जामखेडसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी पवार यांनी केली.


