
Anand Dham : अहिल्यानगर : अहिल्यानगरमधील आनंदधाम (Anand Dham) परिसरात सुरू असलेल्या उपाध्यायश्री पूज्य प्रविणऋषीजी म.सा. (Shri Praveen Rishi Ji Maharaj) यांच्या समर्पण चातुर्मासात गुरूवारी सकाळी राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज (Rashtrasant Acharya Anandrishiji Maharaj) यांची १२७ वी जन्म जयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. गुरूभक्तीच्या या पावन महापर्वात नगरसह देशभरातून आलेले भक्त सहभागी झाले होते. गुरू गुणानुवाद तसेच आचार्यश्रींच्या जन्मोत्सवानिमित्त उपवास करणाऱ्या ३६०० हून अधिक तपस्वींचे अट्ठाई प्रत्याख्यान झाले.

देशातील विविध राज्यांतील भाविक उपस्थित
आचार्यश्रींचा जन्मोत्सव महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी म.सा. पूज्य मुनीश्री हितप्रेम विजयजी महाराज, पूज्य आलोकऋषीजी म.सा., पूज्य तिर्थेशऋषीजी म.सा., महासतीजी पूज्य सत्यप्रभाजी म.सा., महासतीजी पूज्य अमितज्योतीजी म.सा., आदी साधूसाध्वीजींच्या सान्निध्यात झाला. याप्रसंगी चातुर्मासाचे मुख्य लाभार्थी अहिल्यानगरचे सुपुत्र, मुंबईचे सुप्रसिद्ध उद्योगपती तसेच तिरुपती बालाजी देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा, धार्मिक परीक्षा बोर्डचे अध्यक्ष नेमीचंद चोपडा, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय चेअरमन रमेश भंडारी, महामंत्री अमितराय जैन, जितोचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, गुरू आनंद फाउंडेशनचे चेअरमन सतीश सुराणा, चेन्नई येथील अर्हम विज्जाचे संस्थापक कांताबाई चोरडिया, गौतम कांकरिया, सौ. राखी सौरभ बोरा, प्रमिलाबाई हेमराजजी बोरा, पराग बोरा व बोरा परिवार, समर्पण चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष अशोक (बाबूशेठ) बोरा, महामंत्री आदेश चंगेडिया, कार्याध्यक्ष राजेश भंडारी, कोषाध्यक्ष विलास कटारिया, उपाध्यक्ष अनिल पोखरणा, राजकुमार बोरा, विजय गुगळे, सुरेश कांकरिया, सचिन देसरडा, मनसुख गुंदेचा, सहसचिव अभय गांधी, अभिजीत गांधी व कमिटीचे सदस्य, सौरभ बोरा मित्र परिवार सदस्य उपस्थित होते. आचार्यश्रींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी नगर, महाराष्ट्रासह बंगलोर, चेन्नई, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक यासह देशातील विविध राज्यांतील भाविक उपस्थित होते. आचार्यश्रींच्या समाधीस्थळी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. जय गुरु आनंदचा जयघोष परिसरात निनादला.

पूज्य प्रविणऋषीजी महाराज म्हणाले की, (Anand Dham)
सतरा वर्षांनंतर गुरूदेवांच्या भूमीत चातुर्मास करायला मिळत आहे. खरं तर हा सतरा वर्षांचा कालावधी माझ्यासाठी वनवास होता. जीवनातील एक चातुर्मास गुरूदेवांच्या चरणी व्हावा ही माझी इच्छा होती. समर्पण चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष अशोक (बाबूशेठ) बोरा व सर्व ट्रस्टींनी अतिशय सुंदर नियोजन केले आहे. आज याठिकाणी प्रत्येकाच्या हृदयात मला पूज्य गुरूदेवांचे दर्शन होत आहे. १२७ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मोजकेच साधू साध्वी होते. तरीही माता हुलसा यांनी आपल्या मुलाचे नाव तीर्थंकरांच्या नावानुसार ठेवले. तेच नेमिचंद आज आनंदऋषीजी म्हणून आपल्या हृदय सिंहासनावर विराजमान आहेत. पूज्य रत्नऋषीजी महाराजांनी अशी मूर्ती घडवली की गुरूदेव कायम लोकांच्या हृदयात वसलेत. मोठ्या संख्येने अट्ठाई उपवास करणाऱ्या तपस्वींना फक्त आणि फक्त गुरूदेवांचीच आठवण आली असेल. आज येथील प्रत्येकाने संकल्प करावा की, आपल्या आसपास संप्रदायाची दुही पसरवू देणार नाही. धर्म तुम्हाला जोडतो, संप्रदाय तुम्हाला तोडतो. आपला संघ एक राहील असा दृढ निश्चय करा. गावागावात दर गुरुवारी आनंद चालिसा पाठ सुरू करा.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पूज्य कुंदन ऋषीजी महाराज म्हणाले की, आचार्य भगवंतांचे जीवन खुले पुस्तक होते. प्रत्येक पानावर त्यांनी समाजाला चांगल्या गोष्टी दिल्या. त्यांचे आदर्श जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी पाठशाळा सुरू केल्या. पुढे देशभरात अनेक शैक्षणिक संस्था निर्माण झाल्या. त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांना ऊर्जितावस्था देण्यासाठी अनेक आर्थिक संस्था सुरू केल्या. यातून अनेकांना आजही मदत मिळत आहे. समाजाला संघटित करण्यासाठी त्यांनी राजस्थान, पंजाब, जम्मू पर्यंत विहार केला. अशा महापुरुषांचा आज जन्मोत्सव आहे. यानिमित्त ३६०० हून अधिक तपस्वींंनी उपवास केले. ही गुरूदेवांवरील खरी श्रद्धाच आहे.
पूज्य मुनीश्री हितप्रेम विजयजी महाराज. म्हणाले की, आपण मुलांना योग्य वयात शिकवले पाहिजे. माता हुलसा यांनी हेच काम केले आणि ऋषी आनंद आपल्याला मिळाले. आपल्या अंतर्मनात धर्माचा वास हवा. आचार्यश्रीजींनी विनम्र राहून सर्व धर्म ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. संप्रदाय एक केला. आचार्यश्रींच्या कर्मभूमीत जन्मोत्सवाला उपस्थित राहताना खूप आनंद होत आहे.
जैन कॉन्फरन्सचे चेअरमन रमेश भंडारी म्हणाले, आजचा दिवस भारत वर्षातील सुवर्ण दिन आहे. महापुरुषांच्या दिव्य गुणांच्या प्रकाशामुळे मानवता उजळून निघते. उपाध्यायश्रींचे समर्पण समाजात सेवाभाव निर्माण करणारे आहे.
सौरभ बोरा म्हणाले, हा चातुर्मास ऐतिहासिक ठरत आहे. चातुर्मास समितीबरोबरच माझा मित्र परिवार या सोहळ्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहे व चातुर्मास पूर्ण होईपर्यंत सर्वांचा उत्साह असाच कायम राहील असा विश्वास आहे.
प्रास्ताविकात अशोक (बाबूशेठ) बोरा म्हणाले की, सतरा वर्षांनंतर उपाध्यायश्रींचा चातुर्मास होत आहे हे अहिल्यानगरचे भाग्य आहे. समर्पण चातुर्मासासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. मुख्य लाभार्थी सौरभ प्रमिलाबाई हेमराजजी बोरा यांनी समर्पित भावनेने योगदान दिले आहे. अहिल्या नगरमध्ये आचार्य भगवंतांनंतर प्रथमच इतका मोठा चातुर्मास होत आहे याचा गौरव वाटतो. तपस्यांचा मोठा वर्षाव यावेळी झाला आहे.
स्वागत करताना आदेश चंगेडिया म्हणाले, आज याठिकाणी आचार्यश्रींचा जन्मोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त ३६०० हून अधिक तपस्वींंनी उपवास केला आहे. गुरूदेवांच्या या कर्मभूमीत वातावरण खूप सकारात्मक व ऊर्जादायी झाले आहे.
अनिल पोखरणा म्हणाले, गुरूदेवांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रचंड मोठ्या संख्येने भाविकांनी अट्ठाई उपवास केले आहेत. हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. सर्व तपस्वींना समितीकडून धन्यवाद देतो.
विलास कटारिया म्हणाले, नगरमधील हा चातुर्मास सर्वांची स्वप्नपूर्ती करणारा आहे. चातुर्मास प्रत्येकाला नवीन ज्ञान देणारा ठरेल यात शंका नाही. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी आचार्यश्रींच्या ध्वनीमुद्रीत मंगल पाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.


