
Rahibai Soma Popere : अकोले : “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया…” या गीतातून व्यक्त होणाऱ्या बहीण-भावाच्या नात्यातील प्रेमाची अनोखी अनुभूती पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे (Rahibai Soma Popere) यांनी यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त करून दिली आहे. गावरान बियाण्यांपासून (Indigenous Seeds) स्वतःच्या हाताने बीजराख्या तयार करून त्यांनी बंधू मानलेल्या मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना ही आगळीवेगळी भेट दिली आहे.
पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश
भात, नागली, वरई, काकडी, भोपळा, तूर, मूग, उडीद, वाल, घोसाळी, डांगर भोपळा आदी विविध गावरान बियांचा वापर करून राहीबाईंनी या बीजराख्या तयार केल्या आहेत. या राख्यांमधून बहीण-भावाच्या नात्यासोबतच गावरान बियाण्यांचे संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेशही त्यांनी दिला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले गावरान बियाणे (Rahibai Soma Popere)
राहीबाई यांनी बीजबँकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांपर्यंत गावरान बियाणे पोहोचविले असून, या कार्यातून अनेक शेतकऱ्यांना त्यांनी आपले भाऊ मानले आहे. त्यांच्या वात्सल्यपूर्ण कार्यामुळे अनेक शेतकरीही त्यांना बहिणीचे स्थान देतात. याच प्रेमाची आणि आदराची जपणूक करण्यासाठी त्यांनी यंदा बीज राखीची विशेष संकल्पना राबविली. मंत्री चंद्रकांत पाटील यांना राहीबाई आपला भाऊ मानतात, तर मंत्री पाटीलही त्यांना भगिनीचे स्थान देतात. या प्रेमळ नात्याचे प्रतीक म्हणून तयार केलेली बीजराखी विशेष ठरली आहे.
दरम्यान, देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठीही राहीबाईंनी बीजराख्या तयार केल्या आहेत. “एक धागा राष्ट्रबांधणीचा” या भावनेतून या राख्या देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांना भेट म्हणून पाठविण्यात आल्या आहेत. गावरान बियाण्यांच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन आणि देशसेवेचा संदेश देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.
यावर्षी राहीबाई यांच्या नातवंडांनी सायली आणि धनश्री यांनीही बीजराख्या तयार करण्यासाठी त्यांना मोलाची मदत केली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बीजराखीच्या माध्यमातून त्यांनी बहीण-भावाच्या नात्यासोबतच शेतकरी, निसर्ग आणि देशाच्या संरक्षणाशी असलेले आपले नाते अधिक दृढ केले आहे.


