
National Sports Day : नगर : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त (National Sports Day) सावेडी येथील प्रोफेसर कॉलनी चौक (Professor Colony) शनिवारी (ता. २९) विविध क्रीडा (Sport) प्रकारांच्या प्रात्यक्षिकांनी अक्षरशः गजबजून गेला. हॉकी, सायकलिंग, मल्लखांब, रायफल शूटिंग, तलवारबाजी, ज्युदो, कुस्ती, बॉक्सिंग, खो-खो आणि बास्केटबॉल अशा विविध खेळांच्या थरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. खेळातून आरोग्य, शिस्त आणि जिद्द निर्माण होते, असा संदेश देत या उपक्रमातून शहरात क्रीडा संस्कृती रुजविण्याचे आवाहन करण्यात आले.
नक्की वाचा : सीए असलो तरी अशोक बँकेत नापास झालो : मुरकुटे

क्रीडाप्रेमी नागरिकांची मोठी गर्दी
“खेळामुळे जीवनात शिस्त निर्माण होते. अपयश पचवून पुन्हा प्रयत्न करण्याची आणि यशाची पायरी चढण्याची जिद्द खेळातून निर्माण होते,” असे प्रतिपादन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर, जिल्हा ऑलिंपिक संघटना, एकविध खेळ संघटना आणि विविध क्रीडा मंडळांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच प्रोफेसर कॉलनी चौकात खेळाडू, प्रशिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे संपूर्ण परिसराला क्रीडोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

झुंबा नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात (National Sports Day)
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रोफेसर कॉलनी चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच ऑलिंपिकवीर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सागर अलचेट्टी व ग्रुप यांच्या मार्गदर्शनाखाली झुंबा नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी महापालिका आयुक्त यशवंत डांगे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, नगरसेवक करण कराळे, पुष्कर कुलकर्णी, सतीश शिंदे, मनोज दुल्लम, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त सुनील जाधव, कोमल वाकळे, मनीषा पुंडे, ज्येष्ठ पत्रकार मोहनीराज लहाडे, अल्ताफ कडकाले, सुधीर चपळगावकर, वेदपाल तनवर आदी मान्यवर उपस्थित होते.

आरोग्यदायी जीवनासाठी मैदानी खेळांची आवश्यकता: करण कराळे
जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय क्रीडा दिनाची पार्श्वभूमी सांगताना क्रीडा संस्कृतीच्या संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देण्याची गरज व्यक्त केली. भारत देश 2030 कॉमनवेल गेम्स व 2036 ऑलिंपिक गेम्स आयोजनाचा प्रमुख दावेदार म्हणून ओळखला जात आहे. अशा उपक्रमांमधून नव्या पिढीला खेळाची प्रेरणा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
चंद्रकांत काळोखे यांनी हॉकीचे महान खेळाडू आणि ऑलिंपिकवीर मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्याची माहिती देत भारतीय हॉकीच्या विकासातील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. नगरसेवक करण कराळे यांनी आरोग्यदायी जीवनासाठी मैदानी खेळांची आवश्यकता अधोरेखित केली. अहिल्यानगर शहरातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत आणि त्यांनी देशासाठी पदके मिळवावीत, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून खेळाकडे वळावे, असे आवाहन केले.

आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की
महापालिका आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, “खेळ केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यातून व्यक्तिमत्त्व विकास आणि करिअरच्या संधी निर्माण होतात. पालकांनी आपल्या मुलांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहित करावे. खेळाडूला अपयशातून पुन्हा उभे राहण्याची ताकद खेळ देतो.” माजी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांच्या कार्याचा पाठ्यपुस्तकात समावेश असल्याचा उल्लेख करून त्यांनी खेळाच्या माध्यमातून समाजात कायमस्वरूपी ठसा उमटविता येतो, असे सांगितले. शहरात क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मल्लखांबाच्या चित्तथरारक कसरतींनी जिंकली मने
कार्यक्रमातील विविध क्रीडा प्रात्यक्षिके हे विशेष आकर्षण ठरले. अहिल्यानगर जिल्हा हॉकी संघटनेच्या वतीने असिफ शेख यांच्या प्रशिक्षणार्थींनी हॉकी खेळाचे, सायकलिंग संघटनेचे प्रा. संजय साठे व संभाजी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलिंग खेळांचे, मल्लखांब संघटनेचे नंदेश शिंदे व श्रीरंग कुलकर्णी यांच्या प्रशिक्षणार्थींनी मल्लखांब खेळाचे, प्रियदर्शनी पब्लिक स्कूल भिंगार येथील प्रशिक्षक सुदर्शन कोतकर यांच्या प्रशिक्षणार्थीनीं रोलर हॉकी, रायफल शूटिंग संघटनेच्यावतीने ऋषिकेश दरंदले व अलिम शेख यांच्या प्रशिक्षणार्थींनी रायफल व पिस्तूल शूटिंग खेळांचे, तलवारबाजी संघटनेच्या वतीने वैष्णवी गोडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलवारबाजी खेळाचेअहिल्यानगर जिल्हा जुदो व कुराश संघटनेच्या वतीने प्रा.संजय धोपावकर व आदित्य धोपावकर यांच्या प्रशिक्षणार्थींनी ज्युदो व कुराश खेळाचे, जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने निलेश मदने यांच्या प्रशिक्षणार्थींनी कुस्ती खेळाचे, जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या वतीने शकील शेख यांच्या प्रशिक्षणार्थींनी बॉक्सिंग खेळाचे, बाणेश्वर क्रीडा मंडळाच्या गणेश वारुळे व रामेश्वर चेमटे यांच्या प्रशिक्षणार्थींनी खो-खो, बास्केटबॉल जिल्हा संघटनेच्या वतीने सचिन भापकर यांच्या प्रशिक्षणार्थींनी बास्केटबॉलचे प्रात्यक्षिक सादर केले, समर्थ विद्यामंदिर व जय बजरंग विद्यालय सावेडीच्या विद्यार्थ्यांनी ढोल पथक व मिरवणूक काढली.
विशेषतः पुरलेला मल्लखांब आणि रोप मल्लखांबाच्या चित्तथरारक कसरतींनी उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. मल्लखांबपटूंनी सादर केलेल्या विविध कसरतींना नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. विविध खेळाडूंच्या कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिकांमुळे पालक आणि क्रीडाप्रेमींमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना सायकल भेट
क्रीडा दिनाच्या निमित्ताने सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी इन्फिनिटी सायक्लोथॉन, अहिल्यानगर, बाईक टेक पॉइंट आणि सायकलिंग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना सायकल भेट देण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा ऑलिंपिक संघटनेचे शैलेश गवळी, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, प्रवीण कोंढावळे, संतोष वाबळे, रमेश जगताप तसेच सागर पवार व अवदूत शेजूळ यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी समर्थ प्रशालेच्या प्राचार्या वसुधा जोशी, क्रीडा शिक्षक लोंढे सर, जय बजरंग विद्यालयाच्या साळुंखे मॅडम, खोखो संघटनेचे विकास परदेशी, मनिष राठोड, प्रसाद पाटोळे, विश्व मिस्किन यांच्यासह विविध खेळ संघटनांचे पदाधिकारी व प्रशिक्षक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सादरीकरण रावसाहेब बाबर यांनी केले.


