
Bhausaheb Firodia Music Academy : अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल म्युझिक अकादमी (Bhausaheb Firodia Music Academy), अहिल्यानगर मध्ये पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर (Pandit Vishnu Digambar Paluskar) यांच्या पुण्यतिथीनिमित्त मासिक संगीत सभा घेण्यात आली. भारतीय शास्त्रीय संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात पंडित पलुस्कर यांचे मोलाचे योगदान आहे. संगीत शिक्षणाला शिस्तबद्ध स्वरूप देत त्यांनी संगीत क्षेत्राला नवी दिशा दिली. त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी या संगीत सभेचे आयोजन करण्यात आले.
बंद घराचे कुलूप तोडून १६ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रमुख पाहुणे म्हणून पवन नाईक उपस्थित
कार्यक्रमाची प्रस्तावना परशुराम मुळे सर यांनी केली. ज्येष्ठ संगीततज्ज्ञ लक्ष्मण डहाळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य माननीय श्री. कैलास साबळे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर सूफी, सुगम व शास्त्रीय गायन करणारे पवन नाईक (Pavan Naik) सर उपस्थित होते. तसेच माजी शिक्षण विस्तार अधिकारी पोपटराव धामणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
भक्ती गीताने जिंकली रसिकांची मने(Bhausaheb Firodia Music Academy)
प्रथम सत्रात कुमारी कावेरी गुंड हिने राग काफी मधील छोटा ख्याल व ‘टाळ बोले चिपळीला’ हे भक्ती गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. त्यानंतर कुमारी श्रद्धा पालवे हिने राग केदार मधील छोटा ख्याव व ‘अवघे गरजे पंढरपूर’ हे भक्ती गीत भावपूर्ण स्वरांत सादर करून रसिकांची मने जिंकली. शौर्य देशमुख याने राग दुर्गा मधील झपतालातील छोटा ख्याल व ‘शिर्डी साई द्वारकामाई’ हे भजन सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
याचदरम्यान नुकत्याच झालेल्या ‘भक्तीसुमन’ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या कौशिक नातू याने ‘देव देव्हाऱ्यात नाही’ हे गीत सादर करून आपल्या सुरेल गायनाची झलक उपस्थितांना दाखवली. त्याच्या भावपूर्ण सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
यानंतर प्रमुख पाहुणे श्री. पवन नाईक सर यांनी सूफी संगीताचे सुरेल सादरीकरण केले. प्रथम त्यांनी मिश्र पिलू रागातील संत नामदेवांची रचना बोबडी गवळण सादर केली तसेच राग दरबारी मध्ये ब्रज भाषेतील रचना भगवान श्रीकृष्ण व प्रभू रामचंद्रांचे प्रेमवर्णन दर्शविणारी रचना सादर केली. राग बैरागी मध्ये सिंधू संस्कृती, वरुणदेवता म्हणजेच झुलेला यांच्या कृपाशिर्वादाचे गीत पंजाबी भाषेत सादर केले. त्यांच्या भावपूर्ण आणि दमदार गायनाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. सूफी संगीताला शास्त्रीय संगीताची सुंदर जोड देत त्यांनी केलेल्या प्रभावी सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
त्यांच्या सादरीकरणाला संकेत गांधी, विजय जाधव, जयंत पाठक, पवन तळेकर, मुलांशु परदेशी, श्रेयस शित्रे व निनाद पारखी यांनी सहाय्यक गायनाची साथ दिली. बँजोवादनाची साथ कुलदीप चव्हाण यांनी केली. हार्मोनियम साथ श्री. परशुराम मुळे व श्री. कल्याण मुरकुटे, तर तबला साथ श्री. विकास साबळे व श्री. सुरज शिंदे यांनी केली. कुमारी जीविका भवर, कुमारी वेदिका भोंदे, कुमारी कावेरी गुंड व कुमारी श्रुतिका दरेकर यांनी तानपुरा साथ दिली.
संस्थेच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती. छायाताई फिरोदिया यांच्या प्रेरणेतून दर महिन्याला मासिक संगीत सभेचे आयोजन केले जाते. तसेच या मासिक संगीत कार्यक्रमास संस्थेचे सहकार्यवाह श्री. गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष श्री. अशोक मुथा, खजिनदार श्री. प्रकाश गांधी, विद्यालयाचे प्राचार्य श्री. कैलास साबळे, उपप्राचार्य श्री. निलेश भालेराव, पर्यवेक्षिका सौ. रेणुका परदेशी, सौ. निलिमा भालेराव, श्री. बाळासाहेब पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संगीत क्षेत्रातील विविध पैलूंचा अनुभव घेण्याची आणि आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळाली. तसेच विद्यालयामध्ये अभिजात शास्त्रीय संगीताचे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय संलग्न स्वतंत्र परीक्षा केंद्र आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी कल्याणी गदादे, कुमारी वेदिका लोंढे व कुमारी प्राची पवार यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी कुमारी वेदिका लोंढे यांनी आभार प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सुरेल सादरीकरणाने आणि श्री. पवन नाईक यांच्या भावपूर्ण सूफी गायनाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. विविध संगीतप्रकारांनी सजलेली ही मासिक संगीत सभा उपस्थित रसिकांसाठी अविस्मरणीय ठरली.


