
Akole Assembly Constituency : अकोले : अकोले विधानसभा मतदारसंघाची (Akole Assembly Constituency) प्रारूप मतदार यादी सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. विशेष सखोल पुनरीक्षणापूर्वी (SIR) मतदारसंघात असलेल्या २ लाख ६८ हजार ६८१ मतदारांपैकी १६ हजार ४३० मतदारांची नावे विविध कारणांमुळे प्रारूप मतदार यादीतून (Draft Voter List) वगळण्यात आली आहेत. वगळण्यात आलेल्या मतदारांचे प्रमाण ६.१२ टक्के असून, जिल्ह्यातील हे सर्वात कमी प्रमाण असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
काही मतदारांची नावे समाविष्ट होऊ शकली नाही
विशेष सखोल पुनरीक्षणानंतर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत एकूण २ लाख ५२ हजार २५१ मतदारांचा समावेश आहे. यामध्ये १ लाख ३२ हजार ३९६ पुरुष, १ लाख १९ हजार ६५४ महिला आणि एका तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे. गणना प्रपत्र विविध कारणांमुळे प्राप्त न झाल्याने जुन्या मतदार यादीतील काही मतदारांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत. यामध्ये निवासाच्या ठिकाणी गैरहजर अथवा न सापडलेले ७२१, स्थलांतरित झालेले ६ हजार ७०८, अन्यत्र नोंदणी झालेले अथवा दुबार मतदार ३ हजार ५०१ आणि मृत झालेल्या ५ हजार ४७४ मतदारांचा समावेश आहे. तसेच गणना प्रपत्र भरून देण्यास नकार दिल्याने २६ मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
३० सप्टेंबरपर्यंत हरकती दाखल करता येणार (Akole Assembly Constituency)
दरम्यान, भारत निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार प्रारूप मतदार यादीवर ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यामुळे वगळण्यात आलेल्या मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करून आवश्यक असल्यास निर्धारित मुदतीत दावा किंवा हरकत दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सुसूत्रीकरणापूर्वी अकोले विधानसभा मतदारसंघात ३०७ मतदार केंद्रे होती. त्यात आणखी दोन केंद्रांची भर पडल्याने आता मतदार केंद्रांची संख्या ३०९ झाली आहे.


