District Collector : संगमनेर मधील अवैध धंद्यांवर मोक्का, तडीपारी आणि MPDA अंतर्गत कारवाई करा : जिल्हाधिकारी 

२०१७ पासून अतिक्रमित असलेला रस्ता खुला

0
District Collector : संगमनेर मधील अवैध धंद्यांवर मोक्का, तडीपारी आणि MPDA अंतर्गत कारवाई करा : जिल्हाधिकारी
District Collector : संगमनेर मधील अवैध धंद्यांवर मोक्का, तडीपारी आणि MPDA अंतर्गत कारवाई करा : जिल्हाधिकारी

District Collector : संगमनेर : तालुक्यातील अवैध धंदे, वाळू व मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन (Illegal Excavation) आणि तस्करी (Smuggling) करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी प्रशासनाला दिले. गरज भासल्यास संबंधितांवर मोक्का, तडीपारी आणि MPDA कायद्यांतर्गत कारवाई करावी. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारांवर व्यापक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

नक्की वाचा : अहिल्यानगर शहरात वेश्याव्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; दोन महिलांची सुटका

विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित

संगमनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित सर्व शासकीय विभागांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रविण सीनारे, उपविभागीय वन अधिकारी अमरजीत पवार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, सर्व पोलिस निरीक्षक तसेच विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जात प्रमाणपत्रांचे वाटप (District Collector)

यावेळी कांजर्भाट समाजातील नागरिकांची अनेक वर्षांपासून जात प्रमाणपत्रासाठी सुरू असलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे. आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे या समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत होत्या. महसूल प्रशासनाने घुलेवाडी, गुंजाळवाडी आणि धांदरफळ येथे स्थानिक पातळीवर चौकशी करून पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्रे निर्गमित केली. संगमनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते समाजातील शालेय विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रमाणपत्रांमुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर होणार आहे.

मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा

जिल्हाधिकाऱ्यांनी संगमनेर नगरपालिकेला प्रत्यक्ष भेट देत प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. शहरातील अनधिकृत अतिक्रमणे तातडीने निष्कासित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांची कामे विहित वेळेत पूर्ण करावीत, मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबवावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.यावेळी त्यांनी नगरपालिकेतील वॉर रूम अर्थात नियंत्रण कक्षाची पाहणी करून तेथील कामकाजाची माहिती घेतली.
डिजिटल क्रॉप सर्व्हेअंतर्गत ई-पीक पाहणीला गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सर्व्हेअरच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवून पुढील सात दिवसांत ३३ टक्के ई-पीक पाहणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या फेरफार नोंदीही विहित मुदतीत निर्गमित करण्याचे निर्देश तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात आले.

२०१७ पासून अतिक्रमित असलेला रस्ता खुला

भूमी अभिलेख विभागातील प्रलंबित जमीन मोजणीची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. शेतरस्ते आणि पांदण रस्त्यांच्या मोजणीसाठी प्राधान्याने भूकरमापक उपलब्ध करून द्यावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रशासनाने अतिक्रमणमुक्त केलेल्या आणि मुरुमीकरण केलेल्या पांदण रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. घुलेवाडी-मालदाड शीवरस्ता अनेक वर्षांपासून बंद होता. प्रशासनाने हा रस्ता खुला करून त्यावर मुरुमीकरण केले आहे. मंगळापूर फाटा येथील पांदण रस्ता तसेच चिखली येथील कौठाचा मळा वस्तीवरील सुमारे १५ वर्षांपासून बंद असलेला रस्ता मागील पंधरवड्यात खुला करण्यात आला. तसेच कोकणेवाडी येथील २०१७ पासून अतिक्रमित असलेला रस्ताही खुला करून त्यावर मुरुमीकरण करण्यात आले आहे.

सायंकाळी उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी शेळकेवाडी-बोटा रस्त्याचीही प्रत्यक्ष पाहणी केली. मालदाड येथे त्यांनी स्वतः शेतात जाऊन डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपच्या माध्यमातून एका शेतकऱ्याची ई-पीक पाहणी नोंदवून घेतली. संगमनेर तालुक्यात अनेक वर्षांपासून बंद असलेले शेतरस्ते आणि पांदण रस्ते खुले करून शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित विभागांना दिले.