Aster Flower : अस्टर फुलला पण भाव नाही, शेतकऱ्याचा संताप; उभ्या पिकावर फिरवला रोटर

गणेशोत्सवाच्या तोंडावर फुल उत्पादक शेतकरी मेटाकुटीला

0
Aster Flower : अस्टर फुलला पण भाव नाही, शेतकऱ्याचा संताप; उभ्या पिकावर फिरवला रोटर
Aster Flower : अस्टर फुलला पण भाव नाही, शेतकऱ्याचा संताप; उभ्या पिकावर फिरवला रोटर

Aster Flower : पारनेर : गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने पारनेर तालुक्यातील शेतकरी पाण्याच्या गंभीर संकटाला सामोरे जात आहेत. जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने विहिरी, तलाव, नद्या आणि कूपनलिका (Borewell) कोरड्या पडल्या आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत मोठ्या कष्टाने फुलांचे पीक उभे केले; मात्र गणेशोत्सवाच्या तोंडावरही अस्टर फुलांना (Aster Flower) अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने पुणेवाडी येथील शेतकरी संतोष विठ्ठल रेपाळे यांनी संताप व्यक्त करत उभ्या अस्टर पिकावर रोटर (Rotor) फिरवला आहे.

नक्की वाचा : सार्वजनिक गणेशोत्सव पूर्णपणे ध्वनी प्रदूषण मुक्त करा; मुम्मका सुदर्शन यांचे आवाहन

उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता

गणेशोत्सवाच्या काळात विविध प्रकारच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे यंदाही चांगला दर मिळेल, या आशेने रेपाळे यांनी अस्टर फुलांची लागवड केली होती. लागवडीपासून मशागत, रोपे, खते, औषध फवारणी, मजुरी आणि पाण्याचा खर्च असा मोठा आर्थिक भार त्यांनी उचलला. मात्र, पावसाने दडी मारल्यामुळे पिकासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करणे कठीण झाले. पाण्याच्या टंचाईमुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असतानाच बाजारात फुलांचे दरही कमी असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली.फुलशेतीमध्ये उत्पादन खर्च मोठा असतो. फुले नाजूक असल्याने त्यांची तोडणी, वर्गीकरण, पॅकिंग आणि वाहतूक यासाठीही खर्च करावा लागतो. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शेतकऱ्यांमध्ये नाराजी (Aster Flower)

बाजारभाव कमी मिळाल्यास हा खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे फुलांचे उत्पादन घेऊन बाजारात विक्री करण्यापेक्षा उभे पीक नष्ट करणे कमी नुकसानकारक ठरत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.याच आर्थिक विवंचनेतून संतोष रेपाळे यांनी आपल्या शेतातील अस्टर पिकावर रोटर फिरवून पीक जमिनीत गाडले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांना चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात बाजारभाव कमी राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.उत्पादन खर्च वाढला, दर मात्र घसरले खते, औषधे, मजुरी, वीज आणि पाण्याचा खर्च सातत्याने वाढत असताना शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. 

नुकसानभरपाईबाबत ठोस उपाययोजना कराव्या

फुलशेती ही अत्यंत जोखमीची शेती असून, हवामानातील बदल आणि बाजारभावातील चढ-उताराचा थेट परिणाम उत्पादकांवर होतो. पारनेर तालुक्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात तरी त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे. शासनाने फुल उत्पादकांसाठी बाजारपेठ, दराची स्थिरता, पाणी उपलब्धता आणि नुकसानभरपाईबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अस्टरच्या उभ्या पिकावर फिरवलेला रोटर हा केवळ एका शेतकऱ्याचा संताप नसून वाढता उत्पादन खर्च आणि मिळणारा कमी बाजारभाव यामुळे फुल उत्पादकांच्या आर्थिक संकटाचे बोलके चित्र ठरत आहे.