
Walse vs Vikhe : नगर : कुकडी पाटबंधारे प्रकल्पातील बहुचर्चित डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याच्या कामावर स्थगिती दिल्याची चर्चा सुरू असतानाच, या बोगद्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पावरून महायुतीतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुजय विखेंचा इशारा
दरम्यान, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी बोगद्याला स्थगिती मिळाल्याच्या चर्चेवर सावध मात्र आक्रमक भूमिका घेतली आहे. “या बोगद्याला कुठल्याही प्रकारे स्थगिती मिळाल्याची माहिती नाही. त्यासंदर्भातील कुठला कागद निघाल्याचेही मला माहिती नाही. हा विषय आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे,” असे विखे यांनी स्पष्ट केले. मात्र, याचवेळी या प्रकरणाशी संबंधित अनेक कागदपत्रे आणि पुरावे आपल्याकडे असल्याचा सूचक इशाराही त्यांनी दिला. “अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत. त्यातून या विषयाला वेगळे आयाम मिळू शकतात. मात्र, मला वाद निर्माण करायचा नाही. वादग्रस्त विधान करायचे असेल तर मीही करू शकतो. कोणत्या व्यक्तीने कुठे काय सहमती दिली, यासंदर्भातील कागदपत्रे माझ्याकडे आहेत,” असे म्हणत विखेंनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना इशारा दिला.
रोहित पवारांविरूद्ध आता नवा भिडू! नगरच्या राजकारणात नवी जुगलबंदी?
वळसे पाटलांचे जुने पत्र चर्चेत (Walse vs Vikhe)
या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांच्या स्वाक्षरीचे एक पत्र सध्या चर्चेत आले आहे. फेब्रुवारी २०१८ मधील या पत्रात डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या कामाचा समावेश कुकडी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये करण्याची मागणी करण्यात आली होती. पत्रात कुकडी प्रकल्पाच्या धरणांतर्गत डिंभे-माणिकडोह बोगद्याबाबत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या निर्णयाचा संदर्भ देण्यात आला आहे. डिंभे धरणातील अतिरिक्त पाणी बोगद्याद्वारे माणिकडोह धरणात साठविण्याच्या प्रस्तावित कामाला मान्यता देण्यात आल्याचा उल्लेख पत्रात आहे. तसेच, डिंभे धरणाचे पाणी बोगद्याद्वारे माणिकडोह धरणात सोडल्यास लाभक्षेत्र वाढण्यास मदत होणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आज ज्या बोगद्याला वळसे पाटील विरोध करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, त्याच प्रकल्पाच्या समावेशासाठी त्यांनी पूर्वी पाठपुरावा केला होता का? असा सवाल या पत्रामुळे उपस्थित होत आहे.
महायुतीतील संघर्षाची ठिणगी? (Walse vs Vikhe)
डिंभे-माणिकडोह बोगद्याचा मुद्दा केवळ एका प्रकल्पापुरता मर्यादित नसून अहिल्यानगरच्या पाण्याच्या हक्काशी संबंधित असल्याचे सुजय विखे यांनी म्हटले आहे. “स्वातंत्र्य काळापासून अहिल्यानगर जिल्हा हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिला आहे. मग आम्ही आमच्या पाण्यासाठी लढायचे नाही का? किती वर्षे पुणे जिल्ह्याचा अन्याय सहन करायचा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी पुणे आणि अहिल्यानगर या दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणीही विखे यांनी केली आहे. डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या स्थगितीचा अधिकृत आदेश समोर आलेला नसल्याचे सुजय विखे यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. एकीकडे अहिल्यानगरच्या पाण्याच्या हक्काचा मुद्दा घेऊन विखे आक्रमक झाले आहेत, तर दुसरीकडे पुणे जिल्ह्याच्या पाणीहिताचा मुद्दा वळसे पाटील यांच्या भूमिकेतून पुढे येत आहे. त्यातच वळसे पाटील यांचे जुने पत्र व्हायरल झाल्याने भूमिका बदलली की परिस्थिती?” हा राजकीय प्रश्न उपस्थित झाला आहे.


