नगर : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा -५ अभियानांतर्गत घेतलेल्या स्पर्धेत अहिल्यानगर (Ahilyanagar News) महापालिकेला (Corporation) सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या तीन क्रमांकामध्ये यंदा पुरस्कार मिळाला आहे. मात्र असं असलं तरीही शहरात कचऱ्याचे ढीग हे जागोजागी आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. मात्र आता यावर कायम तोडगा निघू शकतो. शहरात दररोज निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प (Compressed Biogas Production Project) उभारण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) पुढाकार घेतला आहे.
नक्की वाचा : संगमनेरच्या राधिकाने साकारली गाईच्या शेणापासून ‘इकोफ्रेंडली गणेशमूर्ती’
बुरुडगाव येथील कचरा डेपोत हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. विशेष म्हणजे यासाठी महापालिकेच्या तिजोरीवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. उलट प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिल्याच्या मोबदल्यात महापालिकेला भाडे मिळणार आहे. आयुक्तांनी प्रस्ताव महासभेसमोर मांडण्यास मंजुरी दिल्याने आता महासभेच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
बीपीसीएल स्वखर्चाने प्रकल्प उभारणार (Ahilyanagar News)
सध्या शहरात दररोज १५० ते १६० टन कचरा निघतो. या कचऱ्याचे संकलन करून तो महापालिकेच्या बुरुडगाव येथील कचरा डेपोत टाकला जातो. तेथे या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे खत केले जाते. यासाठी महापालिकेला प्रति टन कचऱ्यासाठी ठेकेदार संस्थेला ५९० रुपये द्यावे लागतात. बीपीसीएल मात्र, स्वखर्चाने प्रकल्प उभारून संकलित कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती करणार आहे. या प्रकल्पामुळे महापालिकेचे पैसे वाचणार असून उलट जागे पोटी भाडेही मिळणार आहे.
अवश्य वाचा : पुण्यात दहीहंडीतील अश्लील नृत्यावर पोलिसांची कारवाई ; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह आठ जणींवर गुन्हा दाखल
महापालिकेचा खर्च वाचणार (Ahilyanagar News)
नगर शहरातील कचऱ्याचे संकलन आणि त्यावर प्रक्रियेसाठी महापालिकेला वर्षाकाठी दहा ते अकरा कोटी रुपयांचा खर्च करावा लागतोय. मात्र बीपीसीएलचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर कचऱ्यावर प्रक्रियेसाठी महापालिकेला लागणारा खर्च वाचणार आहे. बीपीसीएल कंपनीने बायोगॅस प्रकल्प उभारण्याबाबत महापालिकेला विनंती पत्र दिल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बुरुडगाव कचरा डेपो येथील जागेची स्थळपाहणी केली. डेपोवरील मोकळी जागा प्रकल्पासाठी पसंत केली आहे. या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिल्यानंतर प्रकल्पाचे काम तातडीने सुरू होणार आहे.
बीपीसीएल कंपनी स्वखर्चाने हा बायोगॅस प्रकल्प उभारणार असल्याने महापालिकेवर प्रकल्प उभारणीचा कोणताही आर्थिक भार पडणार नाही. महासभेची मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला सुरुवात केली जाईल, असं आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले आहे.



