
संगमनेर : गणपती बाप्पा म्हणजे श्रद्धा,भक्ती आणि प्रत्येकाच्या मनातला जिव्हाळा. मात्र याच बाप्पाच्या विसर्जनानंतर निसर्गाची हानी न होता, त्याच्या आशीर्वादातून नव्या जीवनाची सुरुवात व्हावी, अशी गणेशभक्तांची इच्छा असते. अशीच एक अनोखी संकल्पना संगमनेर (Sangamner News) तालुक्यातील दाढ खुर्दच्या राधिका राजेश गव्हाणे (Radhika Gavhane) या उच्च शिक्षित युवतीने साकारली आहे. तिने गाईच्या शेणापासून गणपती बाप्पाची सात्त्विक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती (Eco-friendly Ganesha Idol) तयार केली आहे. ज्या गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यानंतरही निसर्गात नवनिर्मिती होणार आहे.
नक्की वाचा : पुण्यात दहीहंडीतील अश्लील नृत्यावर पोलिसांची कारवाई ; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह आठ जणींवर गुन्हा दाखल
शेतकरी युवतीने साकारला ‘पर्यावरणपूरक गणपती बाप्पा’ (Sangamner Eco-friendly Ganesha Idol )
संगमनेर तालुक्यात दाढ खुर्द हे छोटंस गाव आहे. या गावातील राजेश गव्हाणे आणि त्यांचं कुटुंब हे गेल्या पंधरा वर्षांपासून गोसेवा करतात. आणि याच गोसेवेतून या शेतकरी युवतीने अनोखा पर्यावरण पूरक गणपती बाप्पा साकारला आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात बाप्पाची घरोघरी दहा दिवस भक्तीभावाने पूजा होते. मात्र अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देताना प्रत्येक भक्ताच्या डोळ्यांत अश्रू असतात.

बाप्पाला निरोप देताना एक नवा संकल्प राधिकाच्या मनात रुजला. त्यामुळे ‘माझ्या बाप्पामुळे निसर्गाला हानी न करता निसर्ग जर पुन्हा पल्लवित झाला, तर हा निरोप किती सुंदर असेल, हीच भावना मनात ठेवून राधिकाने गाईच्या शुद्ध शेणापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचा अनोखा निर्णय घेतला. राधिकाचे कुटुंब हे गेल्या अनेक वर्षांपासून गोसेवा करत आहे, आणि त्यातुनच ही संकल्पना उदयाला आल्याचे राधिकाने सांगितले.
अवश्य वाचा : गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सचा मुद्दा तापला;पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
विसर्जनानंतरही गणेशमूर्ती बनली विशेष (Sangamner Eco-friendly Ganesha Idol )
राधिकाने बनवलेल्या गणपती बाप्पाची खासियत केवळ मूर्तीच्या निर्मितीत नाही. तर बाप्पाच्या विसर्जनानंतरही आहे. ही मूर्ती पाण्यात विसर्जित झाल्यानंतर मूर्तीपासून शेतीसाठी उपयुक्त खत तयार होतं. तसेच औषधी वनस्पतींच्या बियांचाही मूर्ती बनवण्यात समावेश केल्याने नव्याने रोप निर्मिती देखील होणार आहे. त्यामुळे दाढ खुर्दच्या या बीएससी मायक्रो बायोलॉजीचे उच्च शिक्षण घेणाऱ्या राधिका गव्हाणेचा हा उपक्रम गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची सुंदर जोड देणारा ठरत आहे.


