Pune Dahi Handi Obscene Dance : पुण्यात दहीहंडीतील अश्लील नृत्यावर पोलिसांची कारवाई ; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह आठ जणींवर गुन्हा दाखल

0
Pune Dahi Handi Obscene Dance : पुण्यात दहीहंडीतील अश्लील नृत्यावर पोलिसांची कारवाई ; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह आठ जणींवर गुन्हा दाखल

नगर :  पुण्यात दहीहंडी उत्सवादरम्यान अश्लील गाण्यांवर नृत्य (Pune Dahi Handi Obscene Dance) करताना अनेक नृत्यांगनांवर आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवर सहकारनगर पोलिसांनी (Sahkarnagar Police) कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटील हिच्यावर आधीच गुन्हा दाखल झालेला आहे. त्यातच आता आणखी आठ नृत्यांगनांविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना निशा मुंबईकर (Nisha Mumbaikar)आणि शुभांगी थोरात (Shubhangi Thorat) यांच्यासह आठ जणींचा समावेश आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी केवळ कलाकारांवरच नाही, तर कार्यक्रमाचे आयोजक आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले आहेत.

नक्की वाचा : गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सचा मुद्दा तापला;पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

अश्लील गाण्यांवर थिरकणे पडले महाग (Pune Dahi Handi Obscene Dance)

दहीहंडी उत्सवाचा उत्साह, गोविंदांची मोठी गर्दी आणि त्यात रंगलेला नृत्याचा कार्यक्रम. मात्र, याच कार्यक्रमात अत्यंत अश्लील आणि द्विअर्थी गाणी वाजवून त्यावर अश्लील नृत्य केल्याचा गंभीर आरोप संबंधित नृत्यांगनांवर करण्यात आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी कसून तपास सुरू केला असून, कार्यक्रमादरम्यान पोलिसांच्या नियमांचे आणि परवानग्यांचे उल्लंघन झाले आहे का? याचीही सखोल चौकशी केली जात आहे.

अवश्य वाचा : अजितदादांसारखा एवढा मोठा माणूस असा मरत असतो का? मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केली शंका

रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची परवानगी आवश्यक (Pune Dahi Handi Obscene Dance)

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील कला, लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांशी संबंधित ‘रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळा’च्या नियमांनुसार कोणत्याही जाहीर नृत्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे, पुणे शहर पोलिसांकडून अशा नृत्याच्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी विशेष परवानगी घेणे अपेक्षित असते. या नियमांना धाब्यावर बसवून अश्लील सादरीकरण केल्यामुळेच ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणात अष्टविनायक मित्र मंडळ, रिस्की बॉईज ग्रुप यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. या सर्वांविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दहीहंडीच्या नावाखाली अश्लीलता पसरवणाऱ्यांवर पोलीस यापुढेही अशीच कडक कारवाई करणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.