
राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष मुकेश शर्मा यांच्या हस्ते सुविधेचे होणार उद्घाटन
District Consumer Commission : अहिल्यानगर : ग्राहकांच्या तक्रारींच्या सुनावणीची (Consumer Complaint Hearing) प्रक्रिया अधिक सुलभ, गतिमान आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने अहिल्यानगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये (District Consumer Commission) आता आभासी पद्धतीने (Video Conference) सुनावणीची सुविधा उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रात जिल्हास्तरावरील ग्राहक आयोगामध्ये प्रथमच ही सुविधा सुरू होत असून, तिचे उद्घाटन शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता टीव्ही सेंटर येथील प्रशासकीय इमारतीतील ग्राहक आयोगाच्या कार्यालयात होणार आहे.
आभासी सुनावणी सुविधेचे उद्घाटन
राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबईचे अध्यक्ष मुकेश व्ही. शर्मा यांच्या हस्ते या आभासी सुनावणी सुविधेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबईच्या सदस्य पूनम महर्षी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ग्राहकांना त्यांच्या तक्रारींचे निवारण करून घेण्यासाठी न्यायव्यवस्थेपर्यंत सहज पोहोचता यावी, तसेच सुनावणीच्या प्रक्रियेत वेळ आणि श्रमाची बचत व्हावी, या उद्देशाने ग्राहक आयोगाच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अहमदनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणीची सुविधा सुरू करण्यात येत आहे
ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी देशात त्रिस्तरीय ग्राहक आयोगाची रचना करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, राज्यस्तरावर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, तर राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
तर… ग्राहक आयोगाकडे तक्रार करा (District Consumer Commission)
ग्राहकांना सदोष वस्तू किंवा मूल्य देऊन घेतलेल्या सेवेमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल करता येते.
ग्राहकाने एखाद्या वस्तूसाठी किंवा सेवेसाठी पैसे दिल्यानंतर त्याला अपेक्षित दर्जाची वस्तू अथवा सेवा मिळाली नाही, वस्तूमध्ये दोष आढळला किंवा सेवेमध्ये त्रुटी राहिली, अशा प्रकरणांमध्ये ग्राहक आयोगामार्फत तक्रारींची सुनावणी केली जाते. तक्रारीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित ग्राहकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आयोगाच्या माध्यमातून केला जातो.
आभासी सुनावणीची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विविध कारणांमुळे प्रत्यक्ष आयोगात उपस्थित राहणे शक्य नसलेल्या पक्षकारांना किंवा संबंधितांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी प्रक्रियेत सहभागी होणे अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे ग्राहक न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता, सुलभता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या उद्घाटन कार्यक्रमास अहमदनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सादिक अली बशीर सय्यद, तसेच सदस्य चारु डोंगरे आणि संध्या कसबे उपस्थित राहणार आहेत. या सुविधेमुळे जिल्ह्यातील ग्राहक तक्रारींच्या सुनावणीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून, ग्राहक, वकील तसेच संबंधित पक्षकारांसाठी ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे, अशी माहिती ग्राहक आयोग वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. सुनील बी. मुंदडा यांनी दिली.


