Rahata News : राहाता : यावर्षी पावसाने दडी मारल्याने राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पावसाअभावी निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन राहाता तालुका दुष्काळग्रस्त (Drought-affected) जाहीर करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रभावती घोगरे (Prabhavati Ghogre) यांनी केली. याबाबत त्यांनी राहाता तहसीलदारांना निवेदन दिले.
नक्की वाचा : यंदा गणेशोत्सवावर महागाईचे सावट; गणेश मूर्तींचे भाव गगनाला
रब्बी हंगामही संकटात
पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यातील अनेक भागांत पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे. सोयाबीन, मका, बाजरी, कांदा, भाजीपाला यांसह डाळिंब व द्राक्ष आदी फळबागांनाही पावसाअभावी मोठा फटका बसला आहे. पिके व फळबागांना आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच आगामी रब्बी हंगामही संकटात सापडला असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्यातील सद्यस्थितीची प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी व सर्वेक्षण करावे. नुकसानग्रस्त पिके व फळबागांचे पंचनामे करून त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा. तसेच राहाता तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याबाबतचा आवश्यक अहवाल शासनाकडे तातडीने सादर करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात (Rahata News)
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा, नुकसानभरपाई तसेच शासनाच्या विविध दुष्काळी उपाययोजनांचा तातडीने लाभ मिळवून द्यावा. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने दुर्लक्ष न करता मागण्यांची तातडीने पूर्तता करावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेसच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे, राहाता तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चौगुले, विविध विकास संस्था लोणी खुर्दचे चेअरमन भास्कर आहेर, राजेंद्र निर्मळ, महेश आहेर, राजेंद्र जेजुरकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



