Shrirampur News : दारूचे व्यसन ठरले जीवघेणे! श्रीरामपुरात सख्ख्या लहान भावाने केली मोठ्याची हत्या

0
Shrirampur News : दारूचे व्यसन ठरले जीवघेणे! श्रीरामपुरात सख्ख्या लहान भावाने केली मोठ्याची हत्या

नगर : दारूच्या व्यसनाला कंटाळून आणि लग्नात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून लहान भावानेच ‘आपल्या मोठ्या भावाचा’ खून केल्याची खळबळजनक घटना श्रीरामपूर (Shrirampur News) तालुक्यातील उक्कलगाव येथे घडली आहे. श्रीरामपूर शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपी लहान भावाला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. आता या मृत्यूप्रकरणी पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. तरुणाच्या लहान भावानेच टणक वस्तूने मारहाण करून त्याचा खून (Murder Case) केल्याचे उघड झाले. मोठ्या भावाला दारूचे व्यसन असल्याने आणि त्यामुळे आपले लग्न जमत नसल्याचा समज झाल्याने लहान भावाने हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

नक्की वाचा : UPI पेमेंटवर आता शुल्क लागू ; कोणाला, किती अन् कधी लागू होणार?

आता नेमकं काय घडलं? (Shrirampur News)

आशिष उर्फ लाल्या विजय पारखे असे मृत मोठ्या भावाचे नाव असून, आरोपी अनिकेत पारखे (वय २६) असे खून करणाऱ्या लहान भावाचे नाव आहे. १७ सप्टेंबर रोजी सकाळी मयत आशिष हा त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या डाव्या कानाखाली मानेवर गंभीर जखम असल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याचा मृतदेह हा लोणीतील प्रवरा हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. वैद्यकीय अहवालात टणक हत्याराने मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने हा घातपात व खून असल्याचे निष्पन्न झाले.

विशाल खैरे यांनी केला अचुक तपास (Shrirampur News)

पोलिसांनी मृताच्या पत्नीसह नातेवाईकांची कसून चौकशी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली आहेत. मयत आशिष याला दारूचे तीव्र व्यसन होते. तो दारू पिऊन घरात सतत आरडाओरडा करायचा, आशिषच्या या त्रासामुळे त्याची पत्नी गेल्या चार महिन्यांपासून वडिलांकडे राहत होती. आशिषच्या दारू पिण्याच्या व आरडाओरड्याच्या सवयीमुळे आपले लग्न जमत नसल्याची भावना लहान भाऊ अनिकेतच्या मनात निर्माण झाली होती. याच वैमनस्यातून त्याने आपल्या मोठ्या भावाला संपवल्याचे तपासात पुढे आले आहे. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विशाल खैरे यांनी ही घटना उघडकीस आणली आहे.

अवश्य वाचा : स्तनदा मातांसाठी मोठा निर्णय; ST च्या बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे, यांसह पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली होती. याप्रकरणी मृत आशिष यांची पत्नी साक्षी पारखे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयित आरोपी लहान भाऊ अनिकेत पारखे यास तात्काळ अटक केली असून, अनिकेत यानेही तपासात गुन्ह्याची कबुली दिलीय. श्रीरामपूर पोलिसांच्या या जलद व धडाकेबाज कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.