Ahilyanagar Municipal Corporation : नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या (Ahilyanagar Municipal Corporation) स्थायी समितीची सभा सभापती सुभाष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत शहरातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा होऊन विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत (Maharashtra Golden Jubilee Urban Development Mission) शहरातील नवीन ३३ रस्त्यांच्या विकासकामांसाठी प्रकल्प अहवाल (Project Report) तयार करण्याकरिता व्यवस्थापन सल्लागार संस्था नियुक्त करण्यास मंजुरी देण्यात आली. या रस्ते विकासासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याची माहिती सभेत देण्यात आली.
सभेला माजी महापौर बाबासाहेब वाकळे, सदस्य मनोज कोतकर, सुरेश बनसोडे, आकाश कातोरे, सोनाबाई शिंदे, संध्या पवार, मीनाताई चोपडा, गंभीर, हरप्रीत कौर, पूर्णिमा गव्हाळे, सुनिता गेणाप्पा, सेहनाज शेख, नगरसेवक मेहर लहारे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नक्की वाचा : अहिल्यानगरचा देशात डंका ! राष्ट्रपतींच्या हस्ते ‘हमसफर’ लघुपटाला ‘रजत कमल’ पुरस्कार प्रदान
कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश
सभेच्या सुरुवातीला स्थायी समिती सभापती व सदस्यांनी विविध विषयांवर चर्चा करून विषयांना मंजुरी दिली. यावेळी सभापती पै. सुभाष लोंढे यांनी अधिकारी ठराविक लोकांचीच कामे करीत असल्याची चर्चा असल्याचे सांगत, नव्याने निवडून आलेल्या सदस्यांच्या कामांनाही प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. नगरसेवकांचा मान-सन्मान राखून त्यांनी सांगितलेली कामे तातडीने मार्गी लावावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मार्गाचे नियोजन करून नागरिकांना त्याची माहिती द्यावी, आवश्यक त्या ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची निर्मिती करावी, तसेच नेप्ती नाका येथील बारवेची स्वच्छता करण्याचे निर्देश सभापतींनी दिले. सभेला गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशही त्यांनी दिले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
३०० कोटी रुपयांचा निधी आवश्यक (Ahilyanagar Municipal Corporation)
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत नवीन ३३ रस्त्यांच्या कामांसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचा विषय सभेत मांडण्यात आला. यावेळी पारखे यांनी सुमारे ३०० कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे सांगितले. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी व्यवस्थापन सल्लागार संस्था नियुक्त करण्याचा हा विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी या रस्त्यांपैकी किती रस्त्यांवर अतिक्रमणे आहेत आणि रस्ते करताना कोणत्या अडचणी येऊ शकतात, अशी विचारणा केली. त्यावर पारखे यांनी अनेक रस्त्यांवर अतिक्रमणे असल्याचे सांगितले. कार्यारंभ आदेश दिल्यानंतर अतिक्रमणे काढण्यात येतात, अशी माहिती त्यांनी दिली.यावर बाबासाहेब वाकळे, सुरेश बनसोडे आणि सभापती पै. सुभाष लोंढे यांनी रस्त्यांच्या प्रकल्प अहवालात पाण्याच्या लाईन, विद्युत खांब, तारा, अतिक्रमणे आदींची सविस्तर माहिती असणे आवश्यक असल्याचे सांगितले. ही माहिती आधीच अहवालात आल्यास अतिक्रमणे वेळेत हटविता येतील आणि प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर अडचणी निर्माण होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
रस्ता पॅचिंगच्या सुधारित दराच्या विषयावर चर्चा
पारखे यांनी संबंधित कंपनी सर्वेक्षण करून अहवाल तयार करेल. त्यानंतर राज्य शासनाकडून तांत्रिक मंजुरी घेण्यात येईल. निधी मंजूर झाल्यानंतर निविदा प्रक्रिया, कामावर नियंत्रण, देयके आदी कामे संबंधित एजन्सी करेल, अशी माहिती दिली.यावर सभापतींनी परिपूर्ण व सर्व बाबींचा समावेश असलेला अहवाल तयार करण्याचे निर्देश देत विषयाला मंजुरी दिली. रस्ता पॅचिंगच्या सुधारित दराच्या विषयावरही सभेत चर्चा झाली. पारखे यांनी सांगितले की, रस्ता पॅचिंगची निविदा प्रक्रिया झालेली आहे. मात्र, डांबराचे दर वाढले आहेत. प्रस्ताव तयार करताना डांबराचा दर प्रतिटन ४९ हजार रुपये होता. आता हा दर सुमारे ७० हजार रुपये प्रतिटन झाला आहे.
बाबासाहेब वाकळे यांनी महानगरपालिका किती दर देणार, अशी विचारणा केली. त्यावर पारखे यांनी डांबराच्या दराबाबत महिन्यातून दोन वेळा पत्रक येते. प्रत्यक्ष काम करताना असलेला दर विचारात घेऊन त्यानुसार देयके केली जातील, असे स्पष्ट केले. दोन ठेकेदार असून वार्षिक निविदा आहेत. तसेच काही प्रभागांमधील कामे असून त्यांनाही दरातील तफावत द्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठेकेदारांना नोटिसा
सभापतींनी विसर्जन मार्गावरील रस्त्याचे काम झाले आहे का, अशी विचारणा केली. त्यावर पारखे यांनी बाजारपेठेतील कामे झाल्याचे सांगितले. बाबासाहेब वाकळे यांनी निविदा घेऊनही वेळेत कामे पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना भविष्यात नवीन निविदा भरता येणार नाही, अशी तरतूद करण्याची मागणी केली. त्यावर पारखे यांनी संबंधित ठेकेदारांना नोटिसा देण्यात आल्या असून कामाला विलंब झाल्यास दंड आकारण्यात येत असल्याचे सांगितले.यावर सभापतींनी कामांना वेळेचे बंधन घालण्याचे निर्देश देत कामे निर्धारित वेळेतच पूर्ण झाली पाहिजेत, यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जनजागृती निविदेच्या विषयावरही सभेत चर्चा झाली. सभापतींनी या विषयाची माहिती मागितली. शरद जाधव यांनी घनकचरा व्यवस्थापन, कचरा विलगीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती तसेच इतर उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. डोअर-टू-डोअर जनजागृतीसाठी एका घरामागे ३० रुपये खर्च प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी दिली.
केडगाव आणि बुरुडगाव परिसरातील नागरिकांना त्रास
सभापती सुभाष लोंढे आणि बाबासाहेब वाकळे यांनी जनजागृती करताना संबंधित नगरसेवकांना विश्वासात घेण्याची सूचना केली. किती घरांपर्यंत जनजागृती पोहोचली हे कसे समजणार, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर शरद जाधव यांनी जीपीएस अहवाल घेण्यात येणार असल्याचे सांगितले.मनोज कोतकर यांनी कचरा डेपोमध्ये कचऱ्याचे मोठमोठे ढीग असल्याचा मुद्दा उपस्थित केला. हे ढीग कशासाठी करण्यात आले आहेत, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर शरद जाधव यांनी कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे सांगितले. मनोज कोतकर आणि सुरेश बनसोडे यांनी कचऱ्याचा देखावा केला आहे का, असा सवाल उपस्थित केला. केडगावातून कचऱ्याचे ढीग डोंगरासारखे दिसतात. केडगाव आणि बुरुडगाव परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याचे त्यांनी सभेत निदर्शनास आणून दिले.
सभापती सुभाष लोंढे आणि बाबासाहेब वाकळे यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता किती टन आहे, दररोज किती कचरा येतो आणि त्यापैकी किती कचऱ्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जाते, याची माहिती मागितली.विभाग प्रमुख प्रशांत रामदिन यांनी आपण नवीन असल्याने संबंधित माहिती घेत असल्याचे सांगितले. त्यावर सभापती आणि बाबासाहेब वाकळे यांनी तुम्ही कधी कचरा डेपोवर जाऊन पाहणी केली आहे का, तेथील परिस्थिती काय आहे, याची माहिती द्या, अशी विचारणा केली.मनोज कोतकर यांनी शहरातील ओढे-नाले सफाईचे किती काम झाले, याची माहिती सभेत मागितली. अनिकेत बल्लाळ यांनी कामाची माहिती देताना केडगावातील दौंड रोडवर नालेसफाईचे काम सुरू करण्यात आले होते. या कामाची निविदा २८ लाख रुपयांची होती. मात्र, तरतूद संपल्याने काम बंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावर मनोज कोतकर आणि सुरेश बनसोडे यांनी काम अर्धवट राहिल्यामुळे पावसाच्या काळात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल उपस्थित केला. संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली. सभापतींनी निधी संपल्यानंतर उर्वरित कामासाठी प्रस्ताव का करण्यात आला नाही, अशी विचारणा केली. त्यावर बल्लाळ यांनी वाढीव तरतुदीचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून प्रलंबित काम पूर्ण करून घेतले जाईल, असे सांगितले. सभापतींनी तातडीने हे काम मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
मनोज कोतकर यांनी शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त का होत नाही, असा सवाल उपस्थित केला. संबंधित संस्थेला बिले देण्यात आलेली नसल्याने त्यांनी काम बंद केले असल्याचे सांगत पैठणकर साहेबांनी या विषयावर माहिती द्यावी, अशी मागणी केली. मात्र, पैठणकर सभेला उपस्थित नसल्याने मनोज कोतकर यांनी नाराजी व्यक्त केली.‘नगरसेवकांचा अंत पाहू नका, आमची चेष्टा करू नका,’ अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. नवनाथ कातोरे यांनीही नगरसेवकांना किंमत दिली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. ‘निवडणूक घेताच कशाला?’ असा सवाल त्यांनी केला.
बाबासाहेब वाकळे यांनी संबंधित अधिकारीच सभेला उपस्थित नसताना चर्चा कशी करणार, असा सवाल केला. त्यावर सभापती पै. सुभाष लोंढे यांनी पैठणकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले.सभापती पै. सुभाष लोंढे यांनी बल्लाळ यांना उद्देशून ठराविक नगरसेवकांसाठीच काम करता, अशी सर्वत्र चर्चा असल्याचे सांगितले. सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.मनोज कोतकर यांनी केडगावातील नालेसफाईचे काम ठरवून दिलेल्या तारखेच्या आत पूर्ण करण्याची मागणी केली.सभापतींनी नगरसेवकांना मुरूम का दिला जात नाही, अशी विचारणा केली. मागील बैठकीतही याबाबत चर्चा झाली होती, असे त्यांनी सांगितले.
यावर पारखे यांनी यासंदर्भातील प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला होता; मात्र आयुक्तांनी तो नामंजूर केला असल्याचे सांगितले. यावर सभापती पै. सुभाष लोंढे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले की, एकदा उपनगरामध्ये फिरून नागरिकांच्या समस्या समजून घ्या. आम्ही येथे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी बसलो आहोत. नगरसेवकांना टाळाटाळ करणे योग्य नाही. नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना अद्याप अनुभव नसू शकतो; त्यामुळे त्यांचा सन्मान ठेवून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य व खरी माहिती द्यावी. नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या मांडल्या जात असून, त्या समस्या गांभीर्याने घेऊन तातडीने मार्गी लावाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.



