Ahilyanagar | नगर : अहिल्यानगर शहरातील ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपती मंदिरात आज (ता. २५) जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते उत्थापन पूजा करण्यात आली. त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. आज (ता. २५) गणेश विसर्जन मिरवणूक आहे. या मिरवणुकीत १४ मंडळे सहभागी होणार आहेत. विशाल गणपती मंदिरातील गणपतीची विसर्जन मिरवणूक मात्र, मोठ्या उत्साहात पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आली.
नक्की वाचा : स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; १६०० ग्रॅम बनावट सोन्याचे दागिने व ११ मोबाईल हस्तगत

ड्रोन कॅमेरे व सीसीटीव्हीद्वारे पोलिसांचे लक्ष (Ahilyanagar)
अहिल्यानगर शहरात मुख्य विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. थोड्याच वेळात मुख्य विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे. यंदा मनाच्या १२ गणेश मंडळांसह १४ मंडळे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मध्य शहरासह सावेडी, केडगाव, बोल्हेगाव व सारसनगर परिसरात शाडू व पीओपीच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी २० ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यंदाची मिरवणूक १४ तास चालणार आहे. यातील विशाल गणपतीच्या मिरवणुकीपासून या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. मिरवणूक मार्गावर एकेरी वाहतूक असणार आहे. या मार्गावर ड्रोन कॅमेरे व सीसीटीव्हीद्वारे पोलिसांचे लक्ष असणार आहे. काही खासगी व्यवस्थापनाचे सीसीटीव्ही नियंत्रणही पोलिसांकडे असणार आहे. मिरवणुकीसाठी अधिकारी, कर्मचारी असा ८७५ पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. बारा मानाच्या गणपर्तीसह शिवसेना शिंदे गट, दोस्ती तरुण मंडळ मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. महापालिकेतर्फे तीन पारंपरिक व १७ ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यातून ५ जणांना हद्दपार (Ahilyanagar)
भिंगारमधील घटना व शहरातील मागील महिन्याभरातील घटना पाहता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अपर अधीक्षक, तीन पोलीस उपअधीक्षक यांच्यासह पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक असे ७१ अधिकारी, ६६९ पुरुष व महिला पोलिस कर्मचारी, १३५ होमगार्ड अशा ८७५ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आला आहे. शहरातील ५०४ जणांसह जिल्ह्यात एकूण ५६३ जणांवर हद्दपारीची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. दारू विक्री करणाऱ्या २१ विक्रेत्यांचे बाँड घेण्यात आले आहेत. तर, जिल्ह्यातून ५ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. शहरात ४०९ जणांकडून चांगल्या वर्तवणुकीचे बंधपत्र घेण्यात आले आहेत.

मिरवणूक मार्ग (Ahilyanagar)
अहिल्यानगर शहरात गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाला नो व्हेईकल झोन जाहीर करण्यात आला आहे. ही मिरवणूक माळीवाडा विशाल गणपती, अमन पाटील रोड, कौठीची तालीम, जुनी वसंत टाॅकीज, बंगाल चौकी, धरती चौक, हातमपुरा चौक, नालबंद खुंट, रामचंद्र खुंट, आडते बाजार, दाळ मंडई, तेलीखुंट, कापड बाजार, भिंगार वाला चौक, अर्बन बँक रोड, नवीपेठ, नेता सुभाष चौक, मुंजोबा चौक, चितळे रस्ता, पोलीस चौकी, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट, नालेगाव, बाळाजी बुवा विहीर या मार्गावर काढण्यात येणार आहे.



