
ADCC Bank Politics : नगर : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि सिंचन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याच्या प्रश्नावर हेच नेते एकत्र येणार का? असा सवाल आता शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. जिल्हा बँकेसाठी एकजुटीची भूमिका घेणारे नेते पाणी प्रश्नावर मात्र शांत का? अशी चर्चा शेतकरी वर्गात सुरू झाली आहे. जिल्हा सहकारी बँक निवडणूक बिनविरोध करण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर येथे बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध राजकीय गट आणि पारंपरिक विरोधक असलेले नेते एकत्र आले. विखे-थोरात, कोपरगावातील कोल्हे-काळे, श्रीगोंद्यातील पाचपुते-नागवडे तसेच गडाख-विखे या राजकीय विरोधी गटांमध्ये जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ‘सहमती एक्स्प्रेस’ सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. सत्तेतील आणि विरोधातील नेत्यांनी एकत्र येत सहकार क्षेत्रातील निवडणुकीसाठी समन्वयाची भूमिका घेतल्याचे चित्र दिसून आले.
जिल्हा बँकेसाठी विखे-थोरात एकत्र; मंत्री विखे म्हणतात कल्पना नाही
दुसरीकडे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून पुढे आलेल्या डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याच्या निर्णयाला पुणे जिल्ह्यातील नेत्यांनी एकत्रित विरोध केला. पुणे जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते या प्रकल्पाविरोधात एकवटले. या विरोधामुळे जोडबोगद्याच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्याचे सांगितले जात आहे. या स्थगितीला जवळपास २० दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून या प्रश्नावर अपेक्षित तीव्र विरोध किंवा ठोस आंदोलनाची भूमिका अद्याप पुढे आलेली नाही, अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. श्रीगोंद्यातील घनःश्याम शेलार यांनी या प्रश्नावर राजीनाम्याची भूमिका घेतली असली, तरी जिल्ह्यातील इतर प्रमुख नेत्यांनीही शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सहकाराचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न डावलला जातोय? (ADCC Bank Politics)
डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याचा प्रश्न पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि जामखेड तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जातो. या प्रकल्पामुळे सिंचनाच्या प्रश्नाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या स्थगितीनंतर शेतकरी वर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पाणी संघर्षात शेतकरी मोठा लढा उभारण्याच्या तयारीत असताना त्यांचे नेतृत्व करण्यासाठी प्रमुख नेते पुढे येत नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. जिल्हा सहकारी बँकेचा सर्वाधिक कारभार जिल्ह्यातील सहकारी सोसायट्या आणि शेतकऱ्यांशी जोडलेला आहे. पीक कर्ज, शेती कर्ज तसेच दुभत्या जनावरांसाठी कर्ज अशा विविध माध्यमातून बँकेचा मोठा व्यवहार चालतो. त्यामुळे शेतकरी हा जिल्हा बँकेच्या सहकार व्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेला पाणी प्रश्न राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी येत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. बँक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेते एकत्र येऊ शकतात, तर शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नासाठीही अशीच एकजूट का होत नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
प्रोफेसर कॉलनी चौकातील खाद्यपदार्थ स्टॉलवर अन्न व औषध प्रशासनाची धाड
‘सहमती एक्स्प्रेस’ पाणी प्रश्नावरही धावणार का? (ADCC Bank Politics)
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एकत्र आलेले सर्वपक्षीय नेते आता डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याच्या प्रश्नावरही एकत्र येणार का? स्थगिती उठवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी जिल्ह्यातील नेते ठोस भूमिका घेणार का? याकडे पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि जामखेड तालुक्यांतील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. बँक निवडणुकीसाठी निर्माण झालेली राजकीय सहमती आता शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठीही दिसणार का, हा आगामी काळातील महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे.


