
Employment Mega-Fair : नगर : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय (Pandit Deendayal Upadhyay) विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ (Employment Mega-Fair) महाराष्ट्र’चा राज्यस्तरीय शुभारंभ मंगळवार, (ता. २९) सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे. याच दिवशी कोकण व नाशिक विभागातील रोजगार मेळावे होणार आहेत. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजित हा सोहळा नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठ, चर्चगेट येथे होईल.
यावेळी या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री जयकुमार रावल, मंत्री आकाश फुंडकर, महापौर रितू तावडे, खासदार मिलिंद देवरा व खासदार अरविंद सावंत यांच्यासह, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, बृहन्मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो. हेमलता बागल, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, आयुक्त डॉ. अमित सैनी, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सुर्यवंशी यासह वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नक्की वाचा : उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करा; डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश
तीन हजारांहून अधिक उद्योग आस्थापना होणार सहभागी
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या उपक्रमांतर्गत कोकण व नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांत ४१२ हून अधिक रोजगार मेळावे आयोजित केले आहेत. या उपक्रमात कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग तसेच नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे व नंदुरबार या १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. या मेळाव्यांमधून स्थानिक स्तरावर २५ हजारांहून अधिक रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. या महाकुंभात १ हजार ५०० हून अधिक नामांकित कंपन्या आणि तीन हजारांहून अधिक उद्योग आस्थापना सहभागी होणार आहेत.उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभव उपलब्ध रिक्त पदांशी जोडण्यासाठी ‘उमेदवार–रिक्त पद जुळवणी’ करण्यात येणार आहे. त्यामुळे युवक-युवतींना थेट रोजगार संधींसह उद्योगांच्या मनुष्यबळविषयक गरजा, आवश्यक कौशल्ये आणि विविध क्षेत्रांतील करिअर संधींची माहिती मिळेल.
उद्योगांनाही आवश्यक मनुष्यबळ निवडण्याची सुविधा उपलब्ध होईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि सॉफ्ट स्किल्सचे प्लेसमेंटपूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे. रोजगार महाकुंभात सहभागी होण्यासाठी उमेदवार आणि उद्योजकांना क्यूआर कोडद्वारे नोंदणी करता येईल. अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी इच्छुकांनी स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) किंवा जिल्हा सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
‘लाडक्या बहिणीं’साठी विशेष रोजगार मेळावा (Employment Mega-Fair)
या महाकुंभांतर्गत एसएनडीटी महिला विद्यापीठात ‘लाडक्या बहिणीं’साठी स्वतंत्र रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यात सुमारे ६०० ते ७०० महिला उमेदवार सहभागी होणार आहेत. विविध कंपन्यांच्या स्टॉलवर महिलांना उपलब्ध पदे, आवश्यक पात्रता, कामाचे स्वरूप, वेतनश्रेणी आणि भरती प्रक्रियेची थेट माहिती मिळेल. कंपनी प्रतिनिधींशी संवाद साधण्याबरोबरच त्यांना मुलाखती देण्याची संधीही मिळणार आहे. महिलांच्या कौशल्याला रोजगाराची जोड देऊन त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देणे हा या विशेष मेळाव्याचा उद्देश आहे.


