ADCC Bank Election : बिनविरोधच्या प्रयत्नांना पहिल्याच दिवशी धक्का? श्रीगोंद्यातील ‘या’ नेत्याच्या अर्जाने जिल्हा बँकेचे समीकरण बदलणार?

0
बिनविरोधच्या प्रयत्नांना पहिल्याच दिवशी धक्का? श्रीगोंद्यातील ‘या’ नेत्याच्या अर्जाने जिल्हा बँकेचे समीकरण बदलणार?
बिनविरोधच्या प्रयत्नांना पहिल्याच दिवशी धक्का? श्रीगोंद्यातील ‘या’ नेत्याच्या अर्जाने जिल्हा बँकेचे समीकरण बदलणार?

ADCC Bank Election : नगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते एकत्र येत असतानाच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी माजी आमदार राहुल जगताप यांनी विविध सेवा सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्यामुळे बिनविरोधच्या हालचालींना पहिल्याच टप्प्यातच अनपेक्षित वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे, राहुल जगताप यांचा अर्ज हा केवळ एका उमेदवाराचा अर्ज म्हणून पाहिला जात नाही. कारण त्याची पार्श्वभूमी जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडणुकीसाठी झालेल्या राजकीय बैठकीशी जोडली जात आहे.

काल (ता. २७) संगमनेर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. परंपरागत राजकीय विरोधक एकाच व्यासपीठावर आल्याने जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग आल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र, या बैठकीनंतर लगेचच राहुल जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता या प्रयत्नांची खरी कसोटी लागणार आहे.

जिल्हा बँकेसाठी विखे-थोरात एकत्र; मंत्री विखे म्हणतात कल्पना नाही

श्रीगोंद्यात कोणाचे गणित बिघडणार? (ADCC Bank Election)

राहुल जगताप यांनी सेवा सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केल्याने श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय समीकरण विशेष चर्चेत आले आहे. याच मतदारसंघातून प्रताप पाचपुते आणि अनुराधा नागवडे यांच्या नावांचीही चर्चा आहे. त्यामुळे जगताप यांच्या उमेदवारीमुळे आधीपासून सुरू असलेल्या संभाव्य बिनविरोध समीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये जागावाटप आणि परस्पर सहमती हा महत्त्वाचा मुद्दा असतो. अशा परिस्थितीत एका प्रमुख नेत्याने स्वतंत्रपणे अर्ज दाखल केल्यास संपूर्ण गणित पुन्हा मांडावे लागू शकते. त्यामुळे आता पाचपुते-नागवडे गटाची पुढील भूमिका काय राहणार, हा श्रीगोंद्यातील महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. श्रीगोंद्यातून पाचपुते-नागवडे-जगताप वगळता दत्तात्रेय पानसरे, बाळासाहेब नाहाटा, सचिन जगताप अशी इच्छुकांची मोठी यादी आहे. त्यामुळे बिनविरोधच्या प्रयत्नांना श्रीगोंद्यातूनच खो बसण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

सामोपचाराने प्रश्न सोडवू; अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना वळसे पाटलांचे आवाहन

राम शिंदेंच्या भूमिकेचीही चर्चा (ADCC Bank Election)

या संपूर्ण घडामोडीत विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या भूमिकेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी झालेल्या बैठकीत शिंदे आणि खासदार निलेश लंके यांचा समावेश नसल्याची चर्चा असतानाच राम शिंदे जिल्हा बँकेत सक्रिय असल्याचे चित्र आहे. त्यातच राहुल जगताप हे शिंदे यांच्या राजकीय गटाच्या जवळ असल्याची चर्चा असल्याने जगतापांच्या उमेदवारीकडे केवळ स्थानिक निवडणूक म्हणून पाहिले जात नाही. मात्र, या उमेदवारीमागे कोणाचा राजकीय पाठिंबा आहे किंवा कोणती रणनीती आहे, याबाबत अधिकृतपणे काही स्पष्ट झालेले नाही.

जिल्हा बँकेसाठी एकत्र आलेले नेते डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठीही एकत्र येतील का? ‘सहमती एक्स्प्रेस’नंतर पाणी प्रश्नावर नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष

सर्वपक्षीय एकजुटीसमोर पहिलीच परीक्षा? (ADCC Bank Election)

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विविध राजकीय गट एकत्र येत असताना उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या पहिल्याच दिवशी निर्माण झालेला हा पेच महत्त्वाचा ठरतो. कारण राम शिंदे हे आज (ता. २८) अहिल्यानगरमध्ये ठोकून असल्याचे देखील समोर आले आहे. त्यातच राहुल जगताप यांचा अर्ज दाखल होणे याला महत्व प्राप्त झाले आहे. जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी पहिल्याच दिवशी ३६१ उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे. आता पुढील काही दिवसांत कोण कोणते अर्ज दाखल करतो, कोण कोणाशी चर्चा करतो आणि शेवटी कोण अर्ज मागे घेतो, यावर बिनविरोधच्या प्रयत्नांचे भवितव्य ठरणार आहे. राहुल जगतापांचा अर्ज कायम राहतो की तो मागे घेतला जातो, याकडे श्रीगोंद्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मात्र, पहिल्याच दिवशी दाखल झालेल्या या अर्जाने एक संदेश नक्की दिला आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे गणित कागदावर जितके सोपे दिसते, तितके प्रत्यक्ष राजकीय पातळीवर सोपे नसेल.