Rajendra Pawar on Rohit Pawar : ‘तुझ्या तोंडातील सोन्याचा चमचा शोधतोय…’ राजेंद्र पवारांची पुत्र रोहित पवारांसाठी भावनिक पोस्ट चर्चेत

0
‘तुझ्या तोंडातील सोन्याचा चमचा शोधतोय...’ राजेंद्र पवारांची पुत्र रोहित पवारांसाठी भावनिक पोस्ट चर्चेत
‘तुझ्या तोंडातील सोन्याचा चमचा शोधतोय...’ राजेंद्र पवारांची पुत्र रोहित पवारांसाठी भावनिक पोस्ट चर्चेत

Rajendra Pawar on Rohit Pawar : नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या संघर्षावरून विरोधकांकडून होणाऱ्या ‘सोन्याचा चमचा’ या टीकेला त्यांच्या वडिलांनीच भावनिक शब्दांत उत्तर दिले आहे. रोहित पवार यांच्यासोबत MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात रस्त्यावर झोपल्याचा उल्लेख करत राजेंद्र पवार यांनी आपल्या मुलाच्या संघर्षाची आणि पवार कुटुंबाच्या सामाजिक कार्याची कहाणी सोशल मीडियावरील पोस्टमधून मांडली आहे. ‘तुझ्या तोंडात असणारा सोन्याचा चमचा शोधू लागलो’ असे म्हणत राजेंद्र पवार यांनी पोस्टची सुरुवात केली. रोहितचा संघर्ष आणि त्याची कटिबद्धता पाहिल्यानंतर विरोधक सातत्याने करत असलेल्या ‘सोन्याचा चमचा’ या टीकेचा संदर्भ त्यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांना अर्बन नक्सल म्हणणाऱ्यांना २०२९मध्ये विधानसभेत जाऊ देणार नाही – रोहित पवार

आप्पासाहेब पवारांच्या संघर्षाचा दाखला

राजेंद्र पवार यांनी त्यांचे वडील आप्पासाहेब पवार यांच्या संघर्षाचा उल्लेख केला आहे. १९५४ मध्ये अवघ्या ११० रुपये पगारावर त्यांनी नोकरीला सुरुवात केली. २५ वर्षे नोकरी केल्यानंतर पुढील २५ वर्षे शेतकऱ्यांसाठी सामाजिक काम केले. महाराष्ट्राला क्रॉसब्रीड गाईंची ओळख करून ग्रामीण अर्थव्यवस्था बदलली तसेच ठिबक सिंचनाचा प्रसार आणि शेतकऱ्यांच्या जोडधंद्यांसाठी त्यांनी काम केले. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्याचे राजेंद्र पवार यांनी पोस्टमध्ये नमूद केले.

‘५०० डॉलर घेऊन अमेरिकेला गेलो, पण…’ (Rajendra Pawar on Rohit Pawar)

स्वतःच्या संघर्षाची कहाणी सांगताना राजेंद्र पवार यांनी १९७८ मध्ये अवघे ५०० डॉलर घेऊन शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्याचे सांगितले. मात्र, तेथील झगमगाटाकडे न वळता महाराष्ट्रातील स्वतःच्या शेतीत परतलो, असे त्यांनी म्हटले आहे. शेतीसोबत सामाजिक भावनेतून संस्था उभी केली. शेतकऱ्यांसाठी मुरघास, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, पोल्ट्रीसह विविध उपक्रमांची ओळख करून देण्याचे काम केले, असा उल्लेखही त्यांनी केला आहे.

प्रस्थापितांची बिनविरोधकडे वाटचाल? गडाखांनी उघडले खाते; श्रीगोंदा, राहता, पारनेरमध्ये चुरस कायम

‘राजकारणातील विषारी साप डसला तर…’ (Rajendra Pawar on Rohit Pawar)

रोहित पवारांच्या वाटचालीचा उल्लेख करताना राजेंद्र पवार यांनी कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोहितने केवळ स्वतःच्या नोकरीचा विचार केला नाही, तर ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी स्वतःची इंडस्ट्री उभी केल्याचे म्हटले आहे. बालपणीच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. महागडी खेळणी नसल्याने रोहित मित्रांसोबत ओढ्याकाठी मासे आणि खेकडे पकडायला जायचा. सापाचे बिळ आहे की खेकड्याचे, याचा विचार न करता त्यात हात घालण्याची त्याची धाडसी सवय होती, अशी आठवण त्यांनी सांगितली. याच आठवणीचा संदर्भ घेत राजेंद्र पवार यांनी रोहितला राजकारणातील संघर्षासाठी तयार राहण्याचा सल्ला दिला आहे. ‘राजकारणातील एखादा विषारी साप जर कधी डसला तर विष पचवायची तयारी ठेव आणि त्याचे दात उपसायची हिंमतही ठेव,’ असा संदेश त्यांनी दिला आहे.

साखर स्वस्त, पण चारा अन् दूध महागणार? लवकर ऊस गाळपाचा फायदा कुणाला?

‘तुला सोन्याचा चमचा मिळणार नाही; हजारो तरुणांचे सोने कर’ (Rajendra Pawar on Rohit Pawar)

पोस्टच्या शेवटी राजेंद्र पवार यांनी रोहितला राजकारणातील आपल्या भूमिकेबाबतही संदेश दिला आहे. ‘ना तुझा बाप राजकारणात होता, ना तुझ्या बापाचे मोठे राजकारण आहे. त्यामुळे तुझा सोन्याचा चमचा तुला मिळणारही नाही; पण स्वतःसाठी राजकारण न करता हजारो तरुण पिढ्यांचे आणि गोरगरिबांचे सोने कर,’ असे त्यांनी म्हटले आहे. ‘उभारणीच्या संघर्षात वेळ गेल्यामुळे लहानपणी तुला खेळवताही आले नाही; पण आता तुझ्या पाठीशी आहे,’ असे म्हणत राजेंद्र पवार यांनी मुलाला भावनिक पाठिंबा दिला. ‘तुझा पाठीराखा बाप’ या शब्दांत त्यांनी पोस्टचा शेवट केला आहे. त्यामुळे रोहित पवारांवरील ‘सोन्याचा चमचा’ या टीकेला त्यांच्या वडिलांनी दिलेले हे भावनिक उत्तर सध्या चर्चेत आले आहे.