Local Crime Branch : ओडिशातून पुण्याकडे जाणारा ७६ लाखांचा गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

पोलिसांनी सायखिंडी फाटा येथे सापळा रचला

0
Local Crime Branch : ओडिशातून पुण्याकडे जाणारा ७६ लाखांचा गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेकडून दोघांना अटक
Local Crime Branch : ओडिशातून पुण्याकडे जाणारा ७६ लाखांचा गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

Local Crime Branch : नगर : ओडिशा राज्यातून (Odisha State) पुण्याकडे विक्रीसाठी नेण्यात येत असलेला तब्बल १५२.६१ किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने कारवाई करत जप्त केला. या गांजाची किंमत ७६ लाख ३० हजार ५०० रुपये असून, पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी (ता.५) संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या (Sangamner City Police Station) हद्दीत नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सायखिंडी फाटा येथे करण्यात आली. दत्तात्रय नानाभाऊ इचके (वय ३३) आणि श्रीहरी बाळू मिडगुले (वय ३५), दोघेही रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे, अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाईसाठी पथक तयार केले होते. हे पथक संगमनेर शहर परिसरात अवैध धंद्यांची माहिती घेत असताना कारमधून अमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

नक्की वाचा : जिल्हा बँकेच्या बँकेच्या 21 संचालक पदासाठी एकूण ३६३ उमेदवारी अर्ज

सायखिंडी फाटा येथे सापळा रचला

मिळालेल्या माहितीनुसार, कार मधून गांजाची वाहतूक नाशिककडून संगमनेरच्या दिशेने येणार होती. याबाबतची माहिती संगमनेर शहर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सायखिंडी फाटा येथे सापळा रचला. काही वेळाने संशयित कार तेथे येताच पोलिसांनी ती थांबवून पंचांसमक्ष झडती घेतली. कारमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. पोलिसांनी १५२.६१ किलो गांजा, दोन मोबाईल, १७ हजार ९७० रुपये रोख रक्कम, रिकाम्या प्लास्टिक पिशव्या, खाकी रंगाचे रिकामे पुडके आणि दोन एचएसआरपी क्रमांकाच्या नंबर प्लेट असा मुद्देमाल जप्त केला.याशिवाय १२ लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ८८ लाख ७७ हजार ४७० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

ओडिशातून गांजा आणल्याची कबुली (Local Crime Branch)

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत ताब्यातील आरोपींनी हा गांजा ओडिशा राज्यातून ‘कुंफू’ नावाच्या व्यक्तीकडून घेतल्याचे सांगितले. हा माल पुणे जिल्ह्यातील साहेबराव ऊर्फ भाऊसाहेब बाबू मिडगुले आणि पुण्यातील विशाल ऊर्फ दादया यांच्याकडे देण्यासाठी नेण्यात येत असल्याची माहिती आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.