Ambadas Danve : नगर : जिल्ह्यात दुष्काळाची तीव्र परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाकडून केवळ घोषणा केल्या जात आहेत; प्रत्यक्ष मदत मात्र मिळत नाही. सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते (Leader of Opposition in the Legislative Council) अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला.

मोर्चात शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया रद्द करावी, तसेच दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांना तातडीने मदत द्यावी, या मागण्यांसाठी इंडिया आघाडीच्या वतीने बुधवारी (ता.७) अहिल्यानगर येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात अंबादास दानवे यांच्यासह इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सरकार संवेदनशील राहिलेले नाही (Ambadas Danve)
जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, सर्वप्रथम जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर साखर कारखाने असल्याने ते उशिरा सुरू करावेत, अशी मागणी दानवे यांनी केली. शासनाने ट्रिगरवर दुष्काळ जाहीर केला असला तरी त्याचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा होणार नाही. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

सरकार संवेदनशील राहिलेले नाही. सरकारला निवडणुकांमध्ये रस आहे; मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. केवळ घोषणा केल्या जात आहेत. पंचनामे करून प्रश्न सुटणार नाहीत, तर शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष मदत पोहोचली पाहिजे, असेही दानवे म्हणाले. पुणे येथे एमपीएससीच्या पेपरफुटीच्या मुद्द्यावर गेल्या सात-आठ दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असूनही सरकारचे त्याकडे लक्ष नाही. सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. पुण्यात सुरू असलेले हे आंदोलन आता गावागावांत पोहोचेल, असा इशाराही दानवे यांनी दिला.
मोर्चाची सुरुवात जुन्या आरटीओ कार्यालयापासून झाली. डीएसपी चौक मार्गे अहिल्यानगर महापालिका कार्यालयाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. बैलगाड्या आणि ट्रॅक्टरसह कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, मतदारांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवावा आणि पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाऊ नयेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची भूमिकाही इंडिया आघाडीने मांडली. दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधत त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही मोर्चातून करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम काकडे, रामेश्वर निमसे, नगरसेवक योगीराज गाडे यांच्यासह इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या बांधावर आम्ही जातो’: खासदार लंके (Ambadas Danve)
दरम्यान, माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाची पाहणी करावी, अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना लंके यांनी सरकारवर निशाणा साधला. ‘हे जाड कातडीचे सरकार आहे. आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जातो आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतो. मात्र शेतकऱ्यांचे दुःख सरकारपर्यंत पोहोचवायचे असेल, तर आंदोलन करावेच लागते,’ असे लंके म्हणाले. एमपीएससी पेपरफुटीप्रकरणी पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, सात-आठ दिवस उलटूनही सरकारला जाग आलेली नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.



