
LCB : नगर : जास्त सोने देण्याचे आमिष दाखवून महिलांकडील सोन्याचे दागिने हातोहात लंपास करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, घारगाव, नेवासा, कोपरगाव तालुका आणि मिरजगाव येथील चार गुन्हे (Crimes) उघडकीस आले आहेत. पोलिसांनी या गुन्ह्यांशी संबंधित ६ लाख ६० हजार रुपये किमतीची ४४ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त केली आहे.
भुरळ घालून फसविल्याची घटना
३० सप्टेंबर २०२६ रोजी साकूर (ता. संगमनेर) येथील बसस्थानकावर बसलेल्या एका महिलेला तिघांनी भुरळ घालून फसविल्याची घटना घडली होती. या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आरोपींनी काढून घेतले होते. याप्रकरणी महिलेचा मुलगा सोपान पोपटराव डोलनर (रा. चिखलठाण, ता. राहुरी) यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास (LCB)
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष पथक तयार केले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना, हा गुन्हा सचिन संजय गायकवाड (रा. औरंगपूर, ता. शिरूर, जि. बीड) याने साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी ११ ऑक्टोबर रोजी खरवंडी (ता. पाथर्डी) परिसरातून सचिन गायकवाड याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने संतोष मोहनराव चिंतामणी (रा. नाळवंडी नाका, बीड), शहादेव रामदास जाधव (रा. वडवणी, जि. बीड) आणि आबा तुपे (रा. औरंगपूर, जि. बीड) यांच्यासोबत गुन्हा केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी संतोष चिंतामणी यालाही ताब्यात घेतले. अन्य दोन आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अधिक चौकशीदरम्यान आरोपींनी जास्त सोने देण्याचे आमिष दाखवून मिरजगाव, नेवासा आणि चांदेकसारे (ता. कोपरगाव) परिसरातही सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नेवासा पोलीस, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यातील आणि मिरजगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहे
या गुन्ह्यांतील सोन्याच्या दागिन्यांचा शोध घेत पोलिसांनी पंचांसमक्ष ६ लाख ६० हजार रुपये किमतीची ४४ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त केली. पुढील तपासासाठी दोन्ही ताब्यातील आरोपींना जप्त मुद्देमालासह मिरजगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड आणि पोलीस अंमलदार निळकंठ कारखेले, राहुल द्वारके, गणेश लोंढे, विशाल तनपुरे, रोहित मिसाळ, भगवान सानप, फुरकान शेख व प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली.


