
Objections to concrete work : पारनेर : पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Parner Agricultural Produce Market Committee) सुरू असलेल्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामावर (Objections to concrete work) बाजार समितीचे संचालक शंकर नगरे यांनी आक्षेप घेतला आहे. मंजूर ठिकाणी काम न करता दुसऱ्या ठिकाणी काँक्रिटीकरण केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. दुष्काळी परिस्थितीत पाण्याची उपलब्धता नसताना कामाची घाई केली जात असल्याने बांधकामाच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही नगरे यांनी म्हटले आहे.
चांगल्या स्थितीतील काम फोडून पुन्हा काँक्रिटीकरण
नगरे यांच्या म्हणण्यानुसार, बाजार समितीतील काँक्रिटीकरणाच्या दोन कामांसाठी अनुक्रमे ८ लाख ७१ हजार ५०० रुपये आणि ५ लाख ३४ हजार ८०० रुपये, अशी एकूण १४ लाख ६ हजार ३०० रुपयांची अंदाजित रक्कम आहे. काट्याच्या उत्तर बाजूला रस्ता काम मंजूर असताना प्रत्यक्षात यापूर्वी केलेले चांगल्या स्थितीतील काम काँक्रिट ब्रेकरच्या साहाय्याने फोडून त्या ठिकाणी पुन्हा काँक्रिटीकरण केले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
बांधकामासाठी पाणी कुठून आणणार? (Objections to concrete work)
दोन दिवसांपूर्वी संबंधित जागा उकरल्यानंतर लगेच कागद टाकण्यात आला आणि त्यानंतर काँक्रिटीकरण सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. या कामाची पाहणी करण्यासाठी नगरे सकाळी बाजार समितीत गेले असता तेथे सभापती, उपसभापती आणि संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी त्यांनी कामाच्या पद्धतीबाबत विचारणा केली. पाणी मारणे, रोलिंग करणे आणि काँक्रिटीकरणासाठी आवश्यक प्रक्रिया याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना बांधकामांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार का, असा सवाल नगरे यांनी उपस्थित केला. शेतकरी पाणीटंचाईने त्रस्त आहेत. जनावरांना पिण्यासाठी पाणी आणि चारा उपलब्ध होणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत बांधकामाच्या गुणवत्तेसाठी आवश्यक पाणी कुठून आणले जाणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पाण्याअभावी कामांचा दर्जा खालावण्याची शक्यता असल्याने शासनाने अशा परिस्थितीत सुरू असलेल्या कामांचा आढावा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.या प्रकरणी जिल्हा उपनिबंधक यांची भेट घेतल्यानंतर पारनेर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यास सांगण्यात आल्याचे नगरे यांनी सांगितले. त्यानंतर संबंधित कार्यालयाकडून चौकशीसाठी एका महिला अधिकाऱ्याला पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या चौकशीत काय निष्पन्न होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अंदाजपत्रकात पाणी मारण्याच्या कामाचा समावेश नसल्याचे ठेकेदाराचे म्हणणे असल्याचाही दावा नगरे यांनी केला. बाजार समितीतील कामे मंजूर ठिकाणीच आणि आवश्यक दर्जानुसार व्हावीत. कामांमध्ये अनियमितता आढळल्यास त्याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या गरजांना प्राधान्य देऊन बाजार समितीने चारा छावण्या सुरू करण्यासाठी आणि पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही शंकर नगरे यांनी केले.दरम्यान, या आरोपांबाबत बाजार समितीचे पदाधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांची अधिकृत भूमिका समोर आलेली नसल्याने चौकशीतील निष्कर्ष आणि संबंधितांची बाजू महत्त्वाची ठरणार आहे.


